मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : महिलेचे हातपाय बांधून मासिक पाळीच्या रक्ताची विक्री; पुण्यातील अघोरी प्रकारानं राज्यात खळबळ

Pune : महिलेचे हातपाय बांधून मासिक पाळीच्या रक्ताची विक्री; पुण्यातील अघोरी प्रकारानं राज्यात खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 10, 2023 03:55 PM IST

Pune Crime News : राज्यातील सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात महिलेसोबत अघोरी प्रकार करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

Vishrant Wadi Pune Crime News Marathi
Vishrant Wadi Pune Crime News Marathi (HT)

Vishrant Wadi Pune Crime News Marathi : जादुटोणा करण्यासाठी महिलेचे हातपाय बांधून मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी आणि संतापजनक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून त्यानंतर पुणे पोलिसांनी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानंतर आता या धक्कादायक घटनेची पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्मशानभूमीत जादुटोण्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता विश्रांतवाडीत महिलेच्या मासिक पाळीतील रक्त विकण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं संताप व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीत राहणाऱ्या एका महिलेला मासिक पाळी आली होती. त्यावेळी जादुटोण्यासाठी तिच्या सासरच्यांनी तिला मासिक पाळीतील रक्ताची मागणी केली. त्यासाठी महिलेनं नकार दिल्यानंतर सासरच्यांनी विवाहितेचे हातपाय बांधून तिच्या मासिक पाळीतील रक्ताची विक्री केली. त्यानंतर पीडित महिलेनं सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेत सर्व सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा पती सागर ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.

आरोपींवर कठोर कारवाई करा- चंद्रकांत पाटील

पुण्यातील विश्रांतवाडीत महिलेसोबत अघोरी प्रकार घडल्याची घटना समोर आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या आयुक्तांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींविरोधात शारिरिक मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी, अनैसर्गिक कृत्य आणि अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point