मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्यानं वर्तवला अंदाज

Weather Updates : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्यानं वर्तवला अंदाज

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 10, 2023 03:31 PM IST

Weather Updates : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्यानं वर्तवला अंदाज गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली होती.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update (PTI)

Maharashtra Weather Update : गेल्या आठवड्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या हवामानात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. कांदा, गहू, फळबागा आणि भाजीपाल्यांची पिकं जमीनदोस्त झाली असून त्यानंतर आता पुढील काही दिवसांत राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.

हिमालयासह उत्तर भारतातील पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असून त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. त्यामुळं येत्या पाच दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे. प्रतितास ३० ते ४० किमी वेगानं वाऱ्यांचा वेग राहणार असून विजांचा कडकडाटांसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. राज्यातील नंदूरबार, नाशिक, पालधर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला होता. त्यामुळं शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यात गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांचा समावेश होता.

महाराष्ट्रात आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्यानंतर मार्च एप्रिल आणि मे महिन्यात कडाक्याचं ऊन पडत असतं. परंतु यंदाच्या हंगामात मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही वातावरणातील उष्णता वाढलेली नाही. याशिवाय ढगाळ वातावरणामुळं दिवसभरात वातावरणात बदल होत आहे. त्यामुळं आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

WhatsApp channel