मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Matrimony App : ऑनलाईन प्रेमप्रकरण पडलं महागात; लग्नाचं आमिष दाखवून तरुणीला सहा लाखांचा गंडा

Matrimony App : ऑनलाईन प्रेमप्रकरण पडलं महागात; लग्नाचं आमिष दाखवून तरुणीला सहा लाखांचा गंडा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 16, 2023 05:07 PM IST

financial fraud case : पोलीस विभागात काम करत असल्याचं सांगून आरोपीनं तरुणीचा विश्वास जिंकला. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तरुणीची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

financial fraud case in nagpur city
financial fraud case in nagpur city (HT_PRINT)

financial fraud case in nagpur city : मॅट्रिमोनी साईटवर झालेल्या ओळखीतून प्रेमप्रकरण करणं नागपुरातील एका तरुणीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. पोलीस असल्याचं सांगून एका आरोपीनं ऑनलाईन मैत्री करत तरुणीला तब्बल सहा लाखांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक फसवणुकीच्या या घटनेमुळं नागपुरात खळबळ उडाली असून आरोपींचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी मुलगा शोधण्यासाठी पीडित तरुणीनं जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर प्रोफाईल तयार केली होती. त्यानंतर तरुणीची याच साईटच्या माध्यमातून आरोपी संतोष कावळे या तरुणाशी ओळख झाली. आरोपीनं तरुणीला सेल्सटॅक्स इन्स्पेक्टर असल्याचं सांगत पुण्यात नोकरी करत असल्याचं सांगितलं. दोघांना एकमेकांची प्रोफाईल पसंत पडल्यानं त्यांनी बोलणं सुरू केलं. काही महिन्यांनंतर दोघांमध्ये सूत जुळल्यामुळं त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतर आरोपी संतोषनं तरुणीला वैयक्तिक कारणं सांगून काही पैसे मागितले, त्यावेळी संतोष आयुष्यभराचा जोडीदार होणार असल्यानं तरुणीनं आरोपीला पैसे दिले. परंतु त्यानंतरही अनेकदा आरोपीनं पैसे मागितले आणि तरुणीनं दिले. परंतु ज्यावेळी पीडित तरुणीनं आरोपीला पैसे परत मागायला सुरुवात केली त्यावेळी आरोपीनं टाळाटाळ करायला सुरुवात केली.

त्यानंतर तरुणीनं प्रोफाईलची चौकशी केली असता तिला प्रोफाईल फेक असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तरुणीनं तातडीनं या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली. पीडितेनं सप्टेंबर महिन्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तरुणीनं केला आहे. त्यानंतर आता नागपुरातील बलतरोडी पोलिसांनी या प्रकरणात आरोपी संतोष कावळेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळं आता ऑनलाईन मॅट्रिमोनी साईटवरून आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर येत आल्यामुळं तेथील सायबर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग