मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abdul Sattar Controversy : अब्दुल सत्तार आता तरी थांबतील का?; वादग्रस्त वक्तव्यांची यादी पाहाच!

Abdul Sattar Controversy : अब्दुल सत्तार आता तरी थांबतील का?; वादग्रस्त वक्तव्यांची यादी पाहाच!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 08, 2022 12:52 PM IST

Abdul Sattar Controversial Statement : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पहिल्यांदाच वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. अनेकदा ते त्यांच्या विधानांमुळं अडचणीत आले होते.

Abdul Sattar Controversial Statement On Supriya Sule
Abdul Sattar Controversial Statement On Supriya Sule (HT)

Abdul Sattar Controversial Statement On Supriya Sule : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबई, औरंगाबाद आणि सिल्लोडमधील घरांवर दगडफेक केली आहे. याशिवाय महिला लोकप्रतिनिधींवर बेजबाबदार विधान केल्यामुळं त्यांची त्वरीत मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. त्यामुळं आता यावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

काल दुपारी औरंगाबादेत खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार होती. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना सुप्रिया सुळेंनी केलेल्या खोक्यांच्या आरोपांवरून प्रश्न विचारला. तेव्हा सत्तार चांगलेच भडकले आणि म्हणाले की, 'सुप्रिया सुळे इतकी भिकार*** झाली असेल तर तिलाही खोके देऊ', असं म्हणत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळं त्यांच्यावर टीका केली जात आहे.

यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्यांमुळं सत्तार अडचणीत...

काही दिवसांपूर्वीच कृषिमंत्री सत्तार यांनी माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना 'छोटा पप्पू' असं संबोधलं होतं. विरोधकांवर वैयक्तिक पातळीवर टिप्पणी केल्यामुळं सत्तार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. याशिवाय जेव्हा राज्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत असताना सत्तार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना 'तुम्ही दारू घेता का?', असा प्रश्न केला होता. इतकंच नाही तर जेव्हा शिवसेनेतून त्यांनी बंड केलं तेव्हा 'मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येईल', असं म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वी विकासकामांच्या निधीवरून सत्तारांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाला अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली होती. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी सिल्लोडमधील दोन गटातील जमिनीचा वादात मध्यस्थी करताना 'तुमच्या आईला हनुमान***', अशा पद्धतीनं शिवीगाळ करत हिंदू देवतांचा अपमान केला होता. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळं ते कायम कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असतात.

कोण आहेत अब्दुल सत्तार?

२००१ साली अब्दुल सत्तार हे विधानपरिषदेवर पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर ते औरंगाबादेतील सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून गेली तीन टर्म आमदार आहेत. अपक्ष, कॉंग्रेस, शिवसेना आणि आता शिंदे गट असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते कृषिमंत्री आहेत.

सिल्लोडमध्ये एकहाती वर्चस्व पण राज्यात कोलांटउड्या...

अब्दुल सत्तार यांची सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर मजबूत पकड आहे. २०१९ च्या विधानसभेत जिल्ह्यातील सर्व विरोधक त्यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आले होते. परंतु तरीही त्यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. ते कॉंग्रेसमध्ये असताना कधी नारायण राणे, कधी अशोक चव्हाण तर कधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात सामील व्हायचे. त्यामुळं पक्ष बदलण्यात आणि पक्षातील अंतर्गत गटांत कोलांटउड्या मारण्यात सत्तार नेहमीच पुढे असल्याचं दिसून आलेलं आहे.

IPL_Entry_Point