मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vidarbha Politics : विदर्भात ठाकरे गटाला खिंडार; सात जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

Vidarbha Politics : विदर्भात ठाकरे गटाला खिंडार; सात जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 08, 2022 09:57 AM IST

Vidarbha Politics : विदर्भातील सात जिल्ह्यांत युवासेनेच्या जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं ठाकरे गटाला विदर्भात मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Thackeray Group vs Shinde Group In Vidarbha
Thackeray Group vs Shinde Group In Vidarbha (HT)

Thackeray Group vs Shinde Group In Vidarbha : शिवसेनेत बंड झाल्यापासून ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. ४० आमदारांसह १२ खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर अनेक स्थानिक पातळीवरील नेत्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यात मुंबई, मराठवाडा आणि कोकणातील अनेक नेते शिंदे गटात गेले होते. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेळीनं ठाकरे गटाला विदर्भात खिंडार पडलं आहे. कारण विभागातील युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं ऐन महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेल्या किरण पांडव यांनी ठाकरे गटातील नेते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याला अखेर यश आलं आहे. कारण विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या सातही जिल्ह्यातील युवासेना जिल्हाप्रमुख हे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या विश्वासातले सहकारी होते, अशी माहिती आहे.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून राजकीय संकटात सापडलेल्या ठाकरे गटाला मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे. त्यामुळं आता ठाकरे गटाकडून राज्यातील विविध महापालिकांसह विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्यानं पक्षबांधणी केली जात आहे. त्यातच आता विदर्भात युवासेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश...

-हर्षल शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख, चंद्रपूर

-शुभम नवले, युवासेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण

-रोशन कळंबे, युवासेना जिल्हाप्रमुख, भंडारा

-दीपक भारसाखरे, युवासेना जिल्हाप्रमुख, गडचिरोली

-कगेश राव गोंदिया, युवासेना जिल्हाप्रमुख

-नेहा भोकरे, युवतीसेना जिल्हाप्रमुख, नागपूर

-सोनाली वैद्य, युवतीसेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण

-ऋषभ विनोद मिश्रा, युवासेना जिल्हाप्रमुख, गोंदिया

IPL_Entry_Point