Solapur Man Kills Son: मुलाच्या पॉर्न पाहण्याच्या आणि मुलींची छेड काढण्याच्या सवयीला कंटाळून जन्मदात्या पित्यानं त्याची हत्या केली. महाराष्ट्रातील सोलापूर येथे १३ जानेवारी रोजी ही घटना घडली. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने तो बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी त्वरीत पुढील तपासाला सुरुवात केली. चौकशीत आरोपीने विष देऊन मुलाची हत्या केल्याची उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला २८ जानेवारीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय बट्टू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने १३ जानेवारीला आपल्या मुलाला त्याच्या बाईकवरून बाहेर नेले आणि शीतपेयातून विष दिले. त्यानंतर मुलाचा मृतदेह घराजवळील नाल्यात फेकून दिला. गुन्ह्यावर पडदा टाकण्यासाठी आरोपीने मुलगा बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांना पीडितेचा मृतदेह नाल्यात सापडला आणि पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण सोडियम नायट्रेट असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या पत्नी किर्तीची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी यानेच मुलाची हत्या केल्याची त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी विजयला अटक करून २९ जानेवारी रोजी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले. विजयने आपल्या जबाबात म्हटले आहे की, त्याच्या १४ वर्षांच्या मुलाला पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन आणि शेजारी वारंवार आलेल्या तक्रारी त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याने त्याने हा निर्णय घेतला.विजय आता पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.