मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vicky Kaushal: विकी कौशल ‘छत्रपती संभाजी महाराज’ साकारणार? नव्या चित्रपटाबद्दल रंगलीये चर्चा!

Vicky Kaushal: विकी कौशल ‘छत्रपती संभाजी महाराज’ साकारणार? नव्या चित्रपटाबद्दल रंगलीये चर्चा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 24, 2023 11:02 AM IST

Vicky Kaushal new film : विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात ‘छत्रपती संभाजी महाराजां’ची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Vicky Kaushal
Vicky Kaushal

Vicky Kaushal new film : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतो. ‘उरी’ असो वा ‘सरदार उधम’ विकीने नेहमीच प्रत्येक पात्र पडद्यावर अक्षरशः जिवंत केलं आहे. आता विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात ‘छत्रपती संभाजी महाराजां’ची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आतापर्यंत विकी कौशल अनेकदा भारतीय सैनिकाच्या भूमिकेत झळकला आहे. मात्र, आता पडद्यावर शूरवीर संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, विकी कौशलला एक ऐतिहासिक भूमिका ऑफर करण्यात आली आहे. या आगामी चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र, विकी कौशलने अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

याआधी देखील विकी कौशल ऐतिहासिक भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. 'तख्त' आणि 'द अमर अश्वत्थामा' या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये त्याची निवड देखील झाली होती. परंतु, काही कारणांनी हे चित्रपट बंद पडले होते. मात्र, आता विकी या नव्या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज साकारणार असल्याचे समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर विकी देखील मोठ्या पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज साकारणार आहे.

विकी कौशल नुकताच ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर देखील मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. विकी सध्या त्याच्या आगामी ‘सॅम बहादूर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो लष्करी अधिकारी ‘सॅम बहादूर’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग