मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एकमेका सहाय्य करू हे केवळ आता बोलण्यापुरतं नको! ‘बिग बॉस’मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

एकमेका सहाय्य करू हे केवळ आता बोलण्यापुरतं नको! ‘बिग बॉस’मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 22, 2022 01:56 PM IST

Utkarsh Shinde : अभिनेता उत्कर्ष शिंदे याची एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ! हे आता केवळ बोलण्यापुरतं नको’, असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

Utkarsh Shinde
Utkarsh Shinde

Utkarsh Shinde :सनी’ या मराठी चित्रपटाचे शो रद्द करण्याचे प्रकरण सध्या महाराष्ट्रभरात खूप चर्चेत आले आहे. या चित्रपटाचे शो रद्द करून बुकिंग केलेल्या प्रेक्षकांना पैसे परत करण्यात आले आहेत. या प्रकरणी अनेक कलाकार आवाज उठवताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आता ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता उत्कर्ष शिंदे याची देखील एक पोस्ट प्रचंड चर्चेत आहे. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ! हे आता केवळ बोलण्यापुरतं नको’, असं म्हणत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सनी’ या चित्रपटाला महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, असे असतानाही अनेक ठिकाणचे शो थेट रद्द करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर, शो रद्द करण्यात आल्याचे मेसेज प्रेक्षकांना मिळाले असून, पैसे तिकीट बुकिंगचे पैसे देखील परत करण्यात आले आहेत. यावर आता उत्कर्ष शिंदे याने देखील पोस्ट लिहित आपले मत मांडले आहे. आता एकमेकांसाठी उभं राहण्याची वेळ आली असल्याचे त्याने म्हटले आहे.

काय म्हणाला उत्कर्ष शिंदे?

आपल्या या पोस्टमध्ये उत्कर्ष म्हणतो, ‘आज मराठी सिनेमाला बर्बरतेतून समृद्धीच्या वाटेवर आणायचं असेल तर समानतेची वागणूक मिळायलाच हवी. अद्वितीय महान कलाकार दादा कोंडके यांच्या चित्रपटांना त्या काळी चित्रपटगृह मिळाली नव्हती. बहुदा मुद्दाम मराठी चित्रपटाची गळचेपी करायचा मनसुबा काहींचा तेव्हा होता. तोच प्रश्न, तिच वेळ, तेच विचार, तिच कुचंबणा, तिच डावलण्याची मानसिकता आज ही तोंड वर काढतीये. मराठी चित्रपट बनवताना किती कष्टाने सर्व जण आपलं सर्व काही झोकून देत उत्तम चित्रपट तयार करायचा प्रयत्न करतायेत. पण अंततः प्रदर्शनास हक्काचे चित्रपटगृह, मुबलक वेळ,स्क्रीन्स का महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना दिली जात नाहीये? ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या ओळी फक्त बोलण्यापुरत्या नसाव्यात. किमान एकमेकांसाठी उभे राहूया. एकमेकांचा आवाज बनूया, सोबतीने संघटित होत आपले हक्क मिळवूया.’

‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता-गायक उत्कर्ष शिंदे लवकरच महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

IPL_Entry_Point