मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chinmay Mandlekar: इतके दिवस म्हणत होते प्रेक्षक नाहीत, आता...; अभिनेता चिन्मय मांडलेकर का संतापला?

Chinmay Mandlekar: इतके दिवस म्हणत होते प्रेक्षक नाहीत, आता...; अभिनेता चिन्मय मांडलेकर का संतापला?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 22, 2022 01:18 PM IST

Chinmay Mandlekar: महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ‘सनी’चे शो परस्पर रद्द करून थिएटरकडून बुकिंग केलेल्या प्रेक्षकांना पैसे परत केल्याच्या घटना घडल्या आहेत.

Chinamay Mandlekar
Chinamay Mandlekar

Chinmay Mandlekar: सध्या महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांची गळचेपी होताना दिसत आहे. अनेक मराठी चित्रपटांचे शो रद्द केल्याच्या बातम्या देखील समोर येत आहे. यावर आता मराठी कलाकार देखील संतापले आहे. अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक अशा तीनही क्षेत्रात प्रचंड सक्रिय असणाऱ्या चिन्मय मांडलेकर याने देखील एक पोस्ट लिहित आपला संताप व्यक्त केला आहे. याचं कारण ठरलाय त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘सनी’. नवाकोरा ‘सनी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो परस्पर रद्द करण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘सनी’चा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ‘सनी’चे शो परस्पर रद्द करून थिएटरकडून बुकिंग केलेल्या प्रेक्षकांना पैसे परत केल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर आता मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने देखील आपला रोष या पोस्टमधून व्यक्त केला आहे. आधी प्रेक्षक नाहीत अशी कारणं दिली जायची मात्र आता काय झालं?, अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे.

काय म्हणाला चिन्मय मांडलेकर?

‘सनी’चे शो रद्द करून प्रेक्षकांना पैसे परत केल्याच्या घटनेबद्दल कळताच चिन्मय म्हणतो, ‘इतके दिवस ते म्हणत होते की, लोकंच येत नाहीत. आता बुकिंग केलेल्या प्रेक्षकांना मेसेज जातायत की, तुमचं बुकिंग कॅन्सल पैसे परत घ्या. बनवणाऱ्यांनी चित्रपट बनवला, ज्यांनी पाहिला त्यांना आवडला ही आहे, आणखी लोकांना पाहायचा आहे. मग ही मधली लोकं कोण. काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठी चित्रपट सृष्टीतल्या निर्मात्यांची आवर्जून भेट घेतली होती. आता पुन्हा त्यांच्याचकडे हे गाऱ्हाणं मांडावं का?’

अभिनेता ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सनी’ हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची हटके कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, कलाकारांचेही कौतुक होताना दिसत आहे. मात्र, अचानक चित्रपटाचे शो रद्द झाल्याने प्रेक्षकही नाराज झाले होते.

IPL_Entry_Point