मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  जे माझ्या मनाला भावतं ते माझ्या गळ्यातून उतरतं; 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

जे माझ्या मनाला भावतं ते माझ्या गळ्यातून उतरतं; 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 17, 2024 08:47 AM IST

'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जवळपास २७ गाण्यांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

जे माझ्या मनाला भावतं ते माझ्या गळ्यातून उतरतं; 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
जे माझ्या मनाला भावतं ते माझ्या गळ्यातून उतरतं; 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

स्वरगंधर्व सुधीर फडके हे मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव. मराठीसोबतच हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने श्रोत्यांना तृप्त केले. 'गीतरामायणा'तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी 'बाबुजीं'नी मराठी मनावर अधिराज्य केले. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या 'बाबुजीं'ची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे चित्रपटाची कथा?

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या २ मिनिटे ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये बाबुजींची कथा दाखवण्यात आली आहे. करिअरच्या सुरुवातीला जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा त्यांना अनेक गोष्टी सोसाव्या लागल्या होत्या. एक वेळ तर अशी आली की त्यांनी हॉटेलमध्ये देखील काम करावे लागले होते. अगदी शेवटी हतबल होऊन मुंबई सोडत असताना त्यांना एक उत्तम संधी मिळते आणि ते या संधीचे सोने करताना दिसत आहेत. सुधीर फडके यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारली आहे. ट्रेलरमध्ये भारत स्वातंत्र्य होतानाचा देखील काळ दाखवण्यात आला आहे. एकंदरीतच चित्रपटाचा ट्रेलर हा उत्सुकता वाढवणारा आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा: 'या' उत्तराने लारा दत्ता हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; परीक्षकही झाले होते थक्क

हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. या चित्रपटात एकूण २७ गाणी असून या चित्रपटाच्या माध्य्मातून प्रेक्षकांना संगीत नजराणा मिळणार आहे.
वाचा: ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅट सोडण्यास सलमान खान तयार का नाही? काय आहे कारण

कोणते कलाकार दिसणार

'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवादही त्यांनीच लिहिली आहे.
वाचा: अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम

IPL_Entry_Point