प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता सिप्पी गिलचा भीषण अपघात झाला आहे. सिप्पी हा गेल्या काही दिवसांपासून कॅनडाला गेला होता. तिकडे फिरत असताना ब्रिटीश कोलंबिया भागात तिच्या गाडीचा अपघात झाला. भरधाव गाडीचा अचानक ब्रेक दाबल्यामुळे ती उलटली आहे. गायकाने स्वत: सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत अपघात झाल्याची माहिती दिली आहे.
सिप्पीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची गाडी उलटल्याचे दिसत आहे. तसेच सिप्पी या गाडीतून बाहेर पडताना दिसत आहे. त्याला या गाडीतून बाहेर पडण्यास एका व्यक्तीने मदत केली, त्याचेही तो आभार मानताना दिसतो. वेळीच मदत मिळाल्यामुळे सिप्पी गाडीतून बाहेर पडला. त्याला किरकोळ दुखापत झाली. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
वाचा: 'सैराट'मधील हा अभिनेता साकारणार मनोज जरांगेंवरील 'संघर्षयोद्धा' सिनेमात भूमिका
सिप्पीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत, “आम्ही सर्व मित्र कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया इथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, माझ्या मित्रांनी माझ्यासोबत रूमवर थांबण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान मी एकटाच ऑफ-रोडिंगसाठी निघालो. रुबिकॉन कारने जात असताना कार उलटली. मला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने मला मदत केली. या अपघाताबाबत मदत करणारा म्हणाला की, या रस्त्यावर अशा घटना सतत घडत असतात” असे कॅप्शन दिले आहे.
सिप्पी गिल हा एक पंजाबी अभिनेता आणि गायक आहे. त्याची गाणी अतिशय लोकप्रिय आहेत. यामधील सर्वात गाजलेले गाणे म्हणजे 'सोलमेट.' तसेच त्याचे 'बेकदरा' हे गाणे देखील चर्चेत होते. या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत जवळपास १८० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.