सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येताना दिसत आहेत. आता शेतकरी राजाची मातीशी असणारी घट्ट नाळ, त्याच मातीतून पीक उगवण्याची तळमळ आणि त्याच शेतीमुळे त्याचे न जमणारे लग्न या विषयावर आधारित एक नवाकोरा चित्रपट 'नवरदेव (Bsc Agri)’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
'नवरदेव (Bsc Agri)’ या चित्रपटाच्या २ मिनिटे ४६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञान कितीही विकसित झाले, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणे अवघड झाले हे दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील तरूण शेतकरी गावकऱ्यांना एकत्र करुन प्रगत शेती करतोय, जिद्दीने लढायला शिकवतोय. मात्र, असे असूनही नवरीचे आई-वडिल नोकरदार मुलांनाच आपल्या मुली देऊ इच्छितात. बी. एस. सी. अॅग्री केलेल्या महत्त्वाकांक्षी राजवर्धनला लग्नासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं, त्याला नवरी मिळते की नाही, तो सगळ्या अडचणींवर मात करतो का, शेतकरी राजवर्धन नवरीच्या मनात मळा फुलवणार का हे थिएटरमध्ये जाऊनच बघावे लागेल.
वाचा: आदर्श शिंदे यांच्या आवाजातील 'प्रभू श्रीराम' गाणे ऐकलत का?
अभिनेता क्षितीश दाते या चित्रपटात तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. त्यासोबतच प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे, विनोद वणवे अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळेल. हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.