मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nora Fatehi: नोरा फतेही ईडी ऑफिसमध्ये दाखल; २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी पुन्हा चौकशी सुरु

Nora Fatehi: नोरा फतेही ईडी ऑफिसमध्ये दाखल; २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी पुन्हा चौकशी सुरु

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 02, 2022 01:40 PM IST

Nora Fatehi at ED Office: पुन्हा एकदा मनी लाँड्रिंग प्रकरणात नोरा फतेहीची चौकशी होणार असून, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) कलमांतर्गत तिचा जबाब नोंदवला जाणार आहे.

Nora Fatehi
Nora Fatehi

Nora Fatehi at ED Office: सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी अभिनेत्री नोरा फतेही दिल्लीतील ईडी ऑफिसमध्ये दाखल झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी याआधीही अनेकदा नोरा फतेहीची चौकशी करण्यात आली होती. आता काही पुराव्यांच्या आधारे पुन्हा एकदा नोराला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह, नोरा फतेहीचे नाव देखील समोर आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

आता पुन्हा एकदा या प्रकरणात नोरा फतेहीची चौकशी होणार असून, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) कलमांतर्गत तिचा जबाब नोंदवला जाणार आहे. यासाठी अभिनेत्री नोरा फतेही दिल्लीतील ईडी ऑफिसमध्ये पोहोचली आहे. सध्या तिची चौकशी सुरु आहे. ईडीने या मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून नोंदवले होते. तर, नोरा फतेहीच्या नावाची नोंद फिर्यादी म्हणून करण्यात आली होती.

ईडीच्या आरोपपत्रानुसार सुकेश चंद्रशेखर याने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला काही महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. या महागड्या भेटवस्तू घेण्यासाठी त्याने खंडणीतून उकळलेला पैसा वापरला आहे. फोर्टिस हेल्थकेअरचे शिविंदर मोहन सिंह आणि त्याची पत्नी आदिती यांच्याकडून सुकेशने २०० कोटींची खंडणी वसूल केली होती. याच पैशातून त्याने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला काही भेटवस्तू दिल्या. केवळ जॅकलिनच नाही तर, तिच्या कुटुंबातील काही सदस्यांना देखील भेटवस्तू देण्यात आल्या होत्या.

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी पोलिसांनी सुकेश चंद्रशेखर याला अटक केली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. तर, काही दिवसांपूर्वी त्याची मॅनेजर पिंकी इराणी हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आधी नोरा आणि पिंकी यांना समोरासमोर बसून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात नोरा आणि जॅकलिन यांचा सुकेशशी थेट संपर्क होण्यापूर्वी पिंकीची मध्यस्थी झाली होती. सध्या जॅकलिन फर्नांडिस या प्रकारणी जामिनावर असून, तिच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.

IPL_Entry_Point