मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nitin Gadkari Biopic: नितीन गडकरींच्या आयुष्यावर येणार सिनेमा, पहिले पोस्टर प्रदर्शित

Nitin Gadkari Biopic: नितीन गडकरींच्या आयुष्यावर येणार सिनेमा, पहिले पोस्टर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 06, 2023 11:19 AM IST

Highway Man of India movie: आता या चित्रपटात कोणता अभिनेता नितीन गडकरी यांच्या भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Nitin Gadkari Biopic
Nitin Gadkari Biopic

सध्या बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बायोपिकचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता देशाच्या राजकारणातील मोठे नाव असलेले नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित देखील सिनेमा येणार आहे. मोशन पोस्टर प्रदर्शित करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नितीन गडकरी… देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
वाचा: तब्बू व ऐश्वर्यासह रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यावर आली शौचालय साफ करण्याची वेळ

नुकतेच ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोण पाहायला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, "नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे."

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ हा चित्रपट २७ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत. आता या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point