‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना लीला आणि अभिराम यांचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. अंतराची हरवलेली अंगठी पुन्हा एकदा सापडल्यामुळे आता लीलाला अभिरामशी साखरपुडा करावाच लागणार आहे. अंतराची अंगठी आजीने शोधूनच काढली. आता अंतराची अंगठी मिळाल्यानंतर अभिराम देखील साखरपुड्यासाठी तयार झाला आहे. आजच्या भागात दोघांचा साखरपुडा पार पडताना पाहायला मिळणार आहे. भटजी विधिवत पद्धतीने दोघांना एकमेकांच्या बोटात अंगठी घालायला सांगणार असून, यानंतर कुटुंबाचा आशीर्वाद घ्यायला सांगणार आहेत.
तर, आत लीला आणि अभिराम एकमेकांना अंगठी घालत असताना तिथे साळुंके येणार आहे. कालिंदीने आपल्याला फसवलं, लीलाच तुझ्याशी लग्न लावणार सांगून तिने एजेशी लीलाचा साखरपुडा करून दिला, हे लक्षात आल्यानंतर आता साळुंके भलताच चिडणार आहे. रागाने त्याच्या हातातील काचेचा ग्लास खाली पडून फुटणार आहे. आता तो कालिंदीकडून बदला कसा घेता येईल, याचा विचार करत तिथून निघून जाणार आहे. दुसरीकडे, कालिंदी घरी आल्यानंतर सगळ्यांसमोर आपल्या जावयाचा मोठेपणा सांगणार आहे. त्याचवेळी लीला आणि कालिंदी यांच्यासोबतच तिथे दुर्गाची एन्ट्री होणार आहे.
आपल्याला लीलाशी काहीतरी खाजगीत बोलायचंय, असं म्हणत दुर्गा लीलाला तिथून घेऊन जाणार आहे. घरात आतमध्ये गेल्यावर दुर्गा लीलाच्या हातात गुलाबांच्या फुलांचा गुच्छ देत तिला शुभेच्छा देणार आहे. मात्र, त्या फुलांना हात लावताच लीलाच्या हाताला काटे टोचणार आहेत. ज्याप्रमाणे या सुंदर फुलांना काटे आहेत, त्याचप्रमाणे तू अभिरामच्या आयुष्यात आल्यावर मी तुझं आयुष्य असंच उद्ध्वस्त करणार असल्याची धमकी दुर्गा लीलाला देणार आहे. तर, ‘मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मुळात या साखरपुड्यामागे माझा काही उद्देशच नाही. मला माझ्या मनाविरुद्ध हा साखरपुडा करावा लागतोय’, असं म्हणत लीला दुर्गावर चिडणार आहे.
आता मात्र दुर्गा देखील गोंधळून जाणार आहे. इतके दिवस अभिरामचा फायदा घेण्याच्या बहाण्याने लीला त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करतेय, असं दुर्गाला वाटत होतं. मात्र, लीला तिच्या मनाविरुद्ध अभिरामशी साखरपुडा करतेय हे आता दुर्गाला कळणार आहे. याचं कारण देखील लीला दुर्गाला सांगणार आहे. तर, केवळ अभिरामला दिलेल्या एका वचनामुळे आपल्याला त्याच्याशी लग्न करावं लागतं आहे, असं म्हणत लीला आपला संताप दुर्गापुढे व्यक्त करणार आहे. आता मालिकेच्या येत्या भागांमध्ये साळुंके काय करतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या