बॉलिवूड स्टार आमिर खान या शनिवारी नेटफ्लिक्सच्या कॉमेडी चॅट शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पाहुणा म्हणून हजेरी लावणार आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या या भागात आमिर खान, कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमसोबत खूप छान वेळ घालवताना दिसला आहे.
यावेळी कपिल शर्माने स्टेजवर अनेक ट्रॉफी आणल्या आणि त्या सर्व फक्त एका माणसाच्या म्हणजेच आमिर खानच्या असल्याचे म्हटले. याच सीनने या प्रोमोची सुरुवात होते. यानंतर आमिर खानचे स्टुडिओमध्ये प्रेक्षकांकडून जोरदार स्वागत होते आणि तो या एन्ट्री घेतो. या शोमध्ये आमिर खान तक्रार केली की, त्याची मुलं त्याचं अजिबात ऐकत नाहीत. यावेळी बोलताना तो म्हणाला की, त्याने या शोमध्ये येताना काय परिधान करावे, याबद्दल घरात बरीच चर्चा झाली होती. त्याला यावेळी शॉर्ट्स परिधान करायच्या होत्या. मात्र, त्याच्या मुलांनी त्याला फुल पँट घालायला लावली.
यावेळी आमिर खान याने अनेक विषयांवर चर्चा केली. त्याचे ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हे दोन्ही चित्रपट का चालले नाहीत, याचे कारण देखील सांगितले. मात्र, यावेळी आमिर खानला दिलासा देत कपिल म्हणाला की, त्याचे चित्रपट जे चालत नाहीत ते देखील मोठ्या प्रमाणात कमाई करतात. यावेळी परीक्षक पदाच्या खुर्चीत विराजमान असलेली अर्चना पूरण सिंह आमिर खानला प्रश्न विचारते की, तो पुरस्कार सोहळ्यांमध्ये का जात नाही? तेव्हा तो यावर उत्तर देताना म्हणाला की, 'वेळ खूप मौल्यवान आहे, आणि प्रत्येकाने त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे'.
आमिरशी गप्पा मारताना आता कपिल शर्मा अभिनेत्याला त्याच्या तिसऱ्या लग्नाविषयी प्रश्न विचारणार आहे. यावेळी कपिल आमिरला विचारतो की, ‘आता तुम्हालाही सेटल व्हावे असे वाटत नाही का?’ अर्थात त्याचा रोख आमिरच्या तिसऱ्या लग्नाकडे होता. या प्रश्नावर बोलण्याऐवजी आमिर खान फक्त हसला. याआधी आमिरने दोनदा लग्न केले आहे आणि दोनदा त्याचा घटस्फोट देखील झाला आहे. रीना दत्ता आणि किरण राव या त्याच्या माजी पत्नी आहेत. आमिर खानला तीन मुले, जुनैद आणि आझाद आणि मुलगी इरा आहेत.
आमिर खान आता निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो लवकरच ‘लाहोर १९४७’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, राजकुमार संतोषी दिग्दर्शन सांभाळणार आहेत. प्रीती झिंटा, शबाना आझमी, करण देओल आणि अली फजल हे देखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ आता नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला प्रसारित होत आहे. यापूर्वी, ‘चमकिला’ची टीम - दिलजीत दोसांझ, परिणीती चोप्रा आणि इम्तियाज अली देखील शोच्या एका एपिसोडमध्ये दिसले होते.