सध्या सोशल मीडियावर अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वाराणसीमध्ये चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना एक चाहता अचानक नानांजवळ येतो आणि फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. शुटिंग सुरु असताना तो मुलगामध्ये आल्यामुळे नानांना राग येतो आणि ते त्या चाहत्याच्या एक ठेवून देतात. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता स्वत: नानांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
नाना पाटेकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते स्पष्टीकरण देत माफी मागताना दिसत आहेत. “एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मी एका मुलाला मारतोय. हा सीन आमच्या चित्रपटाचाच भाग आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. त्यात पाठीमागून एक जण म्हणतो ‘ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का?’ मी त्यात टोपी घालून असतो. तो येतो मी त्याला पकडून मारतो आणि ‘नीट वाग, उद्धट बोलून नकोस’ असे म्हणतो. त्यानंतर तो जातो. एक रिहर्सल केली, नंतर दिग्दर्शकाने पुन्हा रिहर्सल करायला सांगितले. आम्ही सुरू करणार इतक्यात या व्हिडीओत दिसणारा मुलगा तिथे आला. मला माहीत नव्हते की हा मुलगा कोण आहे, मला वाटले आमच्या टीममधला आहे. त्यामुळे सीननुसार मी त्याला मारले आणि माझा डायलॉग म्हटला. नंतर मला कळाले की हा आमच्या टीममधला माणूस नाही. मग मी त्याला बोलवायला जात होतो, पण तो पळून गेला. त्याच्या मित्राने वगैरे हा व्हिडीओ शूट केला असेल” असे नाना म्हणाले.
वाचा: 'टायगर' ३चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! तिसऱ्या दिवशी छप्पड फाड कमाई
पुढे ते म्हणाले की, “मी कधीच कुणाला फोटोसाठी नाही म्हटलेले नाही. मी इथेही हजारो फोटो काढले, तिथे वाराणसीत घाटावर खूप गर्दी असते. हे चुकून झाले, मला माहीत नाही तो कुठून आला, मी आमच्या टीमचा माणूस समजून रिहर्सलचा सीन शूट केला. या व्हिडीओमुळे कोणताही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा, मी असे कधीच कुणाला मारत नाही, आजपर्यंत मी कधीच असे केलेले नाही. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे मी असे कृत्य कधीच करणार नाही.”
नाना पाटेकर सध्या वाराणसीमध्ये त्यांच्या या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहेत. चित्रिकरण सुरु असताना एक चाहता अचानक नाना यांच्या जवळ येतो आणि सेल्फीची विनंती करतो. चित्रिकरण सुरु असताना अचानक त्याला येताना पाहून नानांना राग अनावर होतो. ते रागाच्या भरात त्या चाहत्याच्या डोक्यावर फटका मारतात. त्यानंतर तो चाहता तेथून निघून जातो.
चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा या प्रकरणावर म्हणाले की, 'मला आता याबाबत कळाले. मी तो व्हिडीओ पाहिला. नानांनी कोणालाही मारले नाही. हा माझ्या चित्रपटातील एक सीन आहे. आम्ही वाराणसीतील रस्त्यांवर चित्रपटाचे शुटिंग करत होतो. या सीनमध्ये नानांना त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या एका मुलाच्या डोक्यात मारायचे असते.'
पुढे ते म्हणाले की, 'आम्ही सीन शुट करत असताना तेथे गर्दी झाली होती. शुटिंग सुरु असताना कोणीतरी मोबाईलच्या कॅमेरात हा सीन रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मी त्यांना सांगू इच्छितो की हा व्हिडीओ खरा नाही. हा चित्रपटातील एक सीन आहे. नानांनी कोणालाही मारलेले नाही.'