मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Movie release in May : ‘हे’ सिनेमे गाजवणार यंदाचा मे महिना, नवाजुद्दीनच्या चाहत्यांसाठी डबल धमाका

Movie release in May : ‘हे’ सिनेमे गाजवणार यंदाचा मे महिना, नवाजुद्दीनच्या चाहत्यांसाठी डबल धमाका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 05, 2023 11:29 AM IST

Movie release in May : सिनेमाप्रेमींसाठी यंदाचा मे महिना खास असणार आहे. मुंबईतील गर्मीत थिएटरचा गारवा अनुभवत प्रेक्षकांना सिनेमांचा आनंद घेता येणार आहे.

Movie
Movie

Movie release in May : शाळांना सुट्टी म्हणजे आख्ख्या कुटुंबाला सुट्टी असते. मग उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी वेगवेगळे प्लान बनवले जातात. त्यात फिरण्याबरोबरच सिनेमे हाही एक पर्याय असतो. उन्हाळी सुट्टीचे प्लान बनवणाऱ्यांसाठी यंदाचा मे महिना खास ठरणार आहे. कारण, या महिन्यात एकापेक्षा एक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. चालू महिन्यात पुढील चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. पाहूया, कोणते आहेत हे सिनेमे?

ट्रेंडिंग न्यूज

द केरळ स्टोरी

इस्लामिक जिहाद आणि धर्मांतरावर आधारित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट आज, ५ मे रोजी प्रदर्शित होतोय. सुदीप्तो सेन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. केरळमधील हिंदू मुलींचं धर्मांतर करून त्यांना दहशतवादी बनवण्याची सत्यकथा मांडण्यात आल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. विपुल अमृतपाल शाह हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा सुदिप्तो, विपुल आणि सूर्यपाल सिंग यांनी लिहिली आहे. द काश्मीर फाइल्सप्रमाणेच या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहेत. त्यामुळं चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

अफवाह

'अफवाह' हा चित्रपट तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करू शकतो. सुधीर मिश्रा यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकी, भूमी पेडणेकर, शरीब हाश्मी आणि सुमीत व्यास असे तगडे कलाकार आहेत. अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

छत्रपती

'छत्रपती' हा चित्रपट याच नावाच्या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपट एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमात ‘बाहुबली’ फेम प्रभास मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. हिंदी रिमेकमध्ये तेलगू सिनेमाचा सुपरस्टार साई श्रीनिवास बेल्लमकोंडा मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाद्वारे तो हिंदीत पदार्पण करतोय. बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा यात झळकणार असून अभिनेता शरद केळकर खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. अभिनेत्री भाग्यश्रीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तेलुगू सिनेमातील दिग्गजांसोबत सिनेमे करणाऱ्या व्हीव्ही विनायक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

IB 71

IB 71 हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यात विद्युत जामवाल आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत. विद्युत जमवालच्या अॅक्शन या चित्रपटाची रंगत वाढवणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला आधीच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विद्युत जमवालचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. याची निर्मिती भूषण कुमार, अॅक्शन हिरो फिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी केली आहे. येत्या १२ मे रोजी हा सिनेमा रिलीज होईल.

जोगिरा सारा रा

'जोगिरा सारा रा रा' हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. लग्न म्हणजे छळ आहे, हा छळ टाळण्यासाठी काय करता येईल? अशी चित्रपटाची वन-लाइन स्टोरी आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा हे यात प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या १२ मे रोजी हा प्रदर्शित होतोय. संजय मिश्रा यात सहाय्यक भूमिकेत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन कुशन नंदी यांनी केलं आहे.

म्युजिक स्कूल

म्युजिक स्कूल हा हिंदी आणि तेलगू भाषेत बनलेला एक भारतीय संगीतमय चित्रपट आहे. शर्मन जोशी आणि श्रिया सरन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात एकूण ११ गाणी असल्याचं बोललं जातं. अकरापैकी तीन गाणी 'द साउंड ऑफ म्युझिक' मधील आहेत. पुढच्या आठवड्यात १२ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

आझम

'आझम' हा जिमी शेरगिल, अभिमन्यू सिंग, इंद्रनील सेनगुप्ता आणि रझा मुराद यांच्या प्रमुख भूमिका असलेला क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. यात जिमी शेरगिल एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये जिमी शेरगिल खास स्टाइलमध्ये पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग