मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amey Khopkar: "पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच", आतिफ अस्लमच्या बॉलिवूड पदार्पणावर मनसेची भूमिका

Amey Khopkar: "पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच", आतिफ अस्लमच्या बॉलिवूड पदार्पणावर मनसेची भूमिका

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 05, 2024 12:09 PM IST

Atif Aslam Come Back in Bollywood: जवळपास ७ ते ८ वर्षांनंतर अतिफ असलम बॉलिवूड चित्रपटाासाठी गाणे गाणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता मनसेने याला विरोध केला आहे.

MNS Leader Amey Khopkar React on pakistani Singer bollywood debut
MNS Leader Amey Khopkar React on pakistani Singer bollywood debut

MNS Leader Amey Khopkar Post: भारतीय इंडस्ट्रीमध्ये पाकिस्तानी कलाकारांना प्राधान्य देऊ नका असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनापक्षाने कायमच म्हणणे असते. पुलवामा हल्ला झाल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकार आणि गायकांवर सतत विरोध केला आहे. अशातच पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार असल्याचे समोर आले आहे. जवळपास ७-८ वर्षांनंतर आतिफ बॉलिवूडमध्ये परतणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पुन्हा आता या विरोधात मनसेने भूमिका घेतली आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'पाकिस्तानी कलाकार खपवून घेतले जाणार नाहीत' असे म्हटले आहे. "अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय" अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी केली आहे.
वाचा: बॉबी देओलने भाचीच्या लग्नात केला 'जमाल कुडू' गाण्यावर डान्स Video Viral

संगिनी ब्रदर्सच्या गाण्यात दिसणार आतिफ अस्लम

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमसोबत कोलॅब करत असल्याची माहिती संगिनी ब्रदर्सने दिली आहे. जवळपास ७ वर्षांनंतर तो बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणार आहे. तो "स्टोरी ऑफ 90's" या चित्रपटातील गाणे गाणार आहे. संगिनी ब्रदर्सने याबाबत माहिती देत सांगितले की, "आतिफ अस्लमला त्यांच्या बॉलिवूड चित्रपटासाठी कास्ट करणे आव्हानात्मक होते. आतिफचे लक्ष चित्रपटाच्या कथेवर होते. त्याला चित्रपटाविषयीची सर्व माहिती सांगायची होती. आतिफला चित्रपटाची कथा खूप आवडली आणि त्याने चित्रपटात गाण्यासाठी होकार दिला."

"स्टोरी ऑफ 90's"मध्ये कोणते कलाकार?

"स्टोरी ऑफ 90's" या चित्रपटात अध्यायन सुमन आणि मिस युनिव्हर्स दिवा दिविता राय या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आतिफ असलमच्या आवाजातील गाणे ऐकण्यासाठी श्रोते आतुर झाले आहेत. या चित्रपटात आतिफ व्यतिरिक्त उदित नारायण आणि अमित मिश्रा हे गायक देखील गाणी गाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पण आता आतिफ अस्लम गाणे गाणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

आजवर अनेक पाकिस्तानी कलाकरांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये फवाद खान, माहिरा खान, इम्रान अब्बास, जावेद शेख या कलाकारांचा समावेश आहे. तसेच बॉलिवूडमधील काही कलाकारांनी पाकिस्तानी चित्रपट देखील केले आहेत. यामध्ये अभिनेते नसिरुद्धीन शाह यांचा समावेश आहे. त्यांनी एका पाकिस्तानी चित्रपटासाठी काम केले आहे.

आतिफ अस्लमची गाणी

आतिफ अस्लमने बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यामध्ये तू जाने ना, तेरा होने लगा हूं, तेरे संग यारा, दिल दियां गल्लां, तेरे बिन, वो लम्हे वो बातें, पिया ओ रे पिया या गाण्यांचा समावेश आहे. भारतात आतिफ अस्लमचा मोठा चाहता वर्ग आहे.

WhatsApp channel

विभाग