मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Piccolo: प्रणवसोबत जुळली अश्विनीची जोडी, ‘पिकोलो’तून प्रेक्षकांच्या भेटीला येणार संगीतमय प्रेमकथा!

Piccolo: प्रणवसोबत जुळली अश्विनीची जोडी, ‘पिकोलो’तून प्रेक्षकांच्या भेटीला येणार संगीतमय प्रेमकथा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 07, 2023 02:33 PM IST

Piccolo Marathi Movie: आजच्या पिढीसमोर असणारे प्रश्न, त्यांना पेलावी लागणारी आव्हानं या साऱ्याचं चित्रण करत नातेसंबंधांचे सूक्ष्म पदर संगीताच्या माध्यमातून अलगदपणे उलगडून सांगणारा ‘पिकोलो’ हा संगीतमय चित्रपट असणार आहे.

Piccolo Marathi Movie
Piccolo Marathi Movie

Piccolo Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात देखील सध्या नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. या नव्या प्रयोगांना प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. नेहमी प्रमाणे त्याच त्याच रटाळवाण्या प्रेमकथा किंवा सासू-सून नातेसंबंध सोडून अनेक नव्या विषयांवरील चित्रपट आता प्रेक्षक आवर्जून पाहू लागले आहेत. अशाच एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट घेऊन अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री अश्विनी कासार ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘पिकोलो’ असून, यातून प्रेक्षकांना संगीतामय मेजवानी मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आजच्या पिढीसमोर असणारे प्रश्न, त्यांना पेलावी लागणारी आव्हानं या साऱ्याचं चित्रण करत नातेसंबंधांचे सूक्ष्म पदर संगीताच्या माध्यमातून अलगदपणे उलगडून सांगणारा ‘पिकोलो’ हा संगीतमय चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले. प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ध्येय साध्य करायचे असते. अर्थात ध्येय सध्या करताना त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. या चित्रपटातही हा संघर्ष पाहायला आहे.

या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून, त्यातून कसा मार्ग काढतात? हे दाखवण्यात येणार आहे, संगीताच्या माध्यमातून चित्रित झालेली प्रेमकथा ‘पिकोलो’ चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे. प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार यांची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात दिसणार आहे.

प्रणव आणि अश्विनी या दोघांसोबत ‘पिकोलो’ चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार, तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे.

फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘पिकोलो’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे, तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत. चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओ करणार आहे. येत्या २६ जानेवारीला ‘पिकोलो’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point