आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालणारा अभिनेता संतोष जुवेकर लवकरच एका हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘शाळा’, ‘बॉईज’ अशा अनेक चित्रपटातून संतोष जुवेकर याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष जुवेकर लवकरच एका बिग बजेट चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
संतोष जुवेकर याने नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्यासोबत धमाल करताना दिसला आहे. अभिनेता संतोष जुवेकर लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर, संतोष जुवेकर देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. याच निमित्ताने संतोष विकीसोबत शूटिंग करत होता. या शूटिंग दरम्यान धमाल करतानाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्यानं एक पोस्ट देखील लिहिली आहे.
या पोस्टमध्ये संतोष जुवेकर याने लिहिले की, ‘फायनली माझं शूट संपलं. पण, शूटिंगचे दिवस आठवणीत राहतील. कारण उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल, तर काम बहारदार रंगत आणि मनही कामात रमतं. या क्लीपमधून तुम्हला आम्ही सेटवर केलेल्या मस्तीची कल्पना येईल, पण मला खात्री आहे सिनेमाचा पहिला ट्रेलर येईल, तेव्हा आम्ही काम करताना काय तोडफोड मेहनत केलीये याचीसुद्धा कल्पना येईल. आम्ही कलाकार जेव्हा एखादं नवीन काम करतो, तेव्हा नवीन माणसांची नवीन मित्रांची ओळख होते आणि एक नवीन कुटुंब तयार होत असतं. आमच्या आयुष्यात आणि आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात, म्हणून माझ्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माझं खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप मोलाची साथ दिलीत.’
पुढे संतोष लिहितो, ‘लक्ष्मण उतेकर सरांनू तुम्हाला आणि आपल्या दिग्दर्शन टीमला आपल्या संपूर्ण @maddockfilms production टीमला, आपले डीओपी सौरभ सर, बबलू सर, फाईट मास्टर परवेज भाई त्यांची टीम आपले सगळे खाऊपिऊ घालणारे डिपार्टमेंटवाले आणि सगळेच.. तुम्हा सगळ्यांना एक प्यारवाली झप्पी! विकी कौशल पाजी, आशिष, अंकित, शुभांकर, बालाजी सर, प्रदीप सर, तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम. आपण सर्वांनी केलेल्या आपल्या मेहनतीला आई भवानीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मायबाप रसिकांचा आशिर्वाद लाभुदे हीच इच्छा आणि प्रार्थना. चलो भेटूयात लवकरच तोपर्यंत..... जय भवानी!’
संबंधित बातम्या