Santosh Juvekar: मोरया’, ‘झेंडा’ सारख्या दमदार मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता संतोष जुवेकर लवकरच एका बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांचा टीझर व्हिडीओ शेअर करत संतोषने स्वतः याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ‘कुत्ते’ या आगामी बॉलिवूड चित्रपटात संतोष महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संतोषने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट वाचून चाहते त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
‘कुत्ते’ चित्रपट आपल्याला कसा मिळाला, हे त्याने या पोस्टमधून सांगितले आहे. सोबतच त्याने एक किस्सा देखील शेअर केला आहे. संतोषचा हा प्रवास वाचून चाहते देखील त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. आपल्या या पोस्टमध्ये संतोषने लिहिलं की, ‘मित्रांनो १३ जानेवारीला एक अजून धमाका "कुत्ते".. खूप स्वप्नं आहेत, त्यातलं एक अजून स्वप्नं सत्यात उतरलं... विशाल भारद्वाज यांच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्यांच्या सिनेमात काम करण्याचं आणि तेही ऑडिशन न देता डायरेक्ट कास्ट केलं मला त्यांनी.. जेंव्हा मुकेश छाबरा सरांच्या ऑफिसमधून कॉल आला २०२१ला तेव्हा मी विचारलं की, सर ऑडिशन करने स्टुडीओ कब आना हैं? त्यावर ते म्हणाले, अरे नही विशाल सरने खुद पर्सनली तुम्हारा नाम मेन्शन किया है के, i want santosh juvekar only for this character!!’
संतोष पुढे म्हणाला, ‘आयच्या गावात आजून काय पाहिजे राव..माझ्या या स्वप्नांसाठी तुमच्या शुभेच्छा, तुमची साथ आणि बाप्पाचा आशिर्वाद कायम हवाय...... हक्काने! अजून खुप काही आश्चर्याचे आनंदी धक्के मला मिळालेत या सिनेमामुळे तेही शेअर करेन तुमच्यासोबत लवकरच..’ आता संतोषच्या या पोस्टवर चाहते देखील कमेंट करून शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. तर, आपल्या अभिनयाच्या जोरावर इथपर्यंतचा प्रवास करणाऱ्या संतोषच चाहत्यांना कौतुक वाटत आहे.
विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘कुत्ते’ या चित्रपटात अभिनेते नसिरुद्दीन शहा, अर्जुन कपूर, अभिनेत्री तब्बू यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहे. तर, या चित्रपटात संतोष जुवेकर देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या