Besharam Rang: दीपिका, शाहरुखच्या अडचणी वाढणार? ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधात याचिका दाखल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Besharam Rang: दीपिका, शाहरुखच्या अडचणी वाढणार? ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधात याचिका दाखल

Besharam Rang: दीपिका, शाहरुखच्या अडचणी वाढणार? ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधात याचिका दाखल

Published Dec 17, 2022 09:36 AM IST

Besharam Rang controversy: ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हा वाद उद्भवला आहे.

Besharam Rang
Besharam Rang

Besharam Rang: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यावर वेगवेगळ्या स्तरांतून टीका होत आहे. अशातच आता ‘बेशरम रंग’ या गाण्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हा वाद उद्भवला आहे. भगव्या रंगाची बिकिनी वापरल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हणत अनेकांनी या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

आता मुजफ्फरपूर येथील वकील सुधीर ओझा यांनी सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आदित्य चोप्रा, जॉन इब्राहिम आणि सिद्धार्थ आनंद यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. हिंदू समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांनी एफआयआर नोंदवण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे आक्षेपार्ह असून ते हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे आहे’, असे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर ३ जानेवारी २०२३ला सुनावणी होणार आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री निरोत्तम मिश्रा यांनी देखील ‘बेशरम रंग’ या गाण्याला विरोध केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते की, 'या गाण्यात दीपिकाचा आऊटफीट अतिशय आक्षेपार्ह आहे आणि हे गाणं अतिशय घाणेरड्या मानसिकतेने शूट करण्यात आले आहे. गाण्यातील सीन्स आणि कपडे व्यवस्थित असायला पाहिजे. नाहीतर मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट चालवायचा की, नाही याचा विचार करावा लागेल.'

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचं 'बेशरम रंग' हे गाणं नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात शाहरुख आणि दीपिकाचा रोमान्स त्यांच्या चाहत्यांना आवडला आहे. तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक करत आहे. एकीकडे या गाण्याला दोघांच्याही चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे या गाण्यातील दीपिकाच्या आऊटफीटमुळे तिला ट्रोल करत तिच्यावर टीका केली जात आहे.

Whats_app_banner