‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन यांची रोमँटिक डेट पाहायला मिळणार आहे. अर्जुन आता हळूहळू सायलीवर प्रेम करू लागला आहे. तर, सायलीला देखील आता अर्जुनचे प्रेम जाणवू लागले आहे. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकत आता सायलीच त्याच्या दिशेने प्रेमाचा हात पुढे करणार आहे. एकीकडे चैतन्यचा राग सहन करणारा अर्जुन, त्याला वाचवण्यासाठी वाटेल ते करायला तयार झाला आहे. साक्षीचा खरा चेहरा अर्जुन चैतन्य समोर उघड करणारच आहे. मात्र, या दरम्यान त्याला चैतन्यच्या रागाला देखील सामोरे जावे लागते आहे.
दुसरीकडे, आपल्या नवऱ्याला इतक्या सगळं वाईट गोष्टी ऐकून घ्याव्या लागत असताना, कुठेतरी त्याच्या मनाला आनंद मिळावा, यासाठी सायली पुरेपूर प्रयत्न करत आहे. आता सायली अर्जुनला डेटवर घेऊन जाणार आहे. पंधरा मिनिटांच्या या रोमँटिक डेटमध्ये सायली अर्जुनला स्कूटरवरून फिरायला नेणार आहे. यावेळी ही स्कूटर सायली चालवणार असून, सायलीच्या मागे अर्जुन बसणार आहे. प्रवासादरम्यान, अर्जुन सायलीला पकडून बसल्याने हा स्पर्श त्यांच्यासाठी प्रेमाचा पहिला स्पर्श असणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकमेकांना इतक्या प्रेमाने आणि जवळून पाहणार आहेत.
या निमित्ताने सायली आणि अर्जुन यांच्यामधील प्रेम आता आणखी फुलून येणार आहे. सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता खऱ्याखुऱ्या लग्नात बदलणार आहे. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले आहेत. केवळ मधु भाऊंना तुरुंगातून सोडवण्यासाठी सुरू झालेले हे नातं, आता खऱ्या अर्थाने पक्क होऊ लागलं आहे. सायलीच्या मनातही अर्जुन विषयी प्रेमांकुर फुटू लागला आहे. तर, अर्जुन मात्र आधीपासूनच सायलीच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. त्यामुळे आता मालिकेच्या येत्या भागांमध्ये सायली आणि अर्जुनची ही प्रेम कथा पाहायला मिळणार आहे. दोघांची ही प्रेम कथा रोमँटिक असली, तरी यांच्यामध्ये व्हिलन नक्कीच येणार आहे. आता हे व्हिलन कोण असणार आणि ते काय करणार? हे देखील येत्या भागांमधून कळणार आहे.
नुकताच साक्षीबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. साक्षी ही अर्जुन आणि चैतन्य यांचा बेस्ट फ्रेंड असणाऱ्या कुणालची गर्लफ्रेंड होती. तर, आपली गर्लफ्रेंड सोडून गेल्यामुळेच कुणालने आत्महत्या केली होती. रीयुनियन दरम्यान समोर आलेल्या फोटोंमधून हा मोठा खुलासा झाला आहे. आता हे सत्य चैतन्यला सांगण्यासाठी अर्जुन आणि सायली धडपड करत आहेत. मात्र, चैतन्यला या कोणत्याही गोष्टींची किंमत नाहीये, तो केवळ साक्षीच्या प्रेमात आंधळा झाला आहे. आता ही गोष्ट त्याला कधी कळणार हे देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.