Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan New Song: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. सलमान खानच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटातील काही गाणी या आधीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेत. आता या चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून. ‘येनतम्मा’ असे या गाण्याचे नाव आहे. या नव्या गाण्यात सलमान चक्क लुंगी नेसून डान्स करताना दिसणार आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील ‘येनतम्मा’ या गाण्याचा टीझर सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये साऊथ स्टाईल लुंगी नेसलेला सलमान खान बुलेटवरून एन्ट्री घेताना दिसत आहे. या गाण्यात सलमान खानसोबत साऊथ सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबाती देखील झळकणार आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये देखील सलमानसोबत व्यंकटेश झळकला आहे. दोघांनी मॅचिंग कपडे परिधान केले असून, या गाण्यातून ते प्रेक्षकांना देखील ठेका धरायला लावणार आहेत.
या गाण्याला विशाल दादलानी आणि पायल देव यांनी आवाज दिला असून, रॅपर रफ्तारचा रॅप देखील या गण्यात पाहायला मिळणार आहे. या गाण्याचा टीझर सध्या तुफान व्हायरल झाला असून, चाहत्यांना सलमान खानचा हा नवा लूक देखील आवडला आहे. या गाण्याच्या टीझर पोस्टरवर सलमान खान आणि व्यंकटेशसोबत अभिनेत्री शहनाज गिल, पालक तिवारी, पूजा हेगडे, अभिनेता राघव जुयाल आणि चित्रपटातील आणखी काही कलाकार देखील झळकले आहेत.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे पहिल्यांदाच सलमान खानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.