करा किंवा मरोच्या सामन्यात आज (९ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६० धावांनी पराभव केला. आरसीबीचा हा सलग चौथा विजय आहे. धर्मशालाच्या मैदानावर बंगळुरूने प्रथम खेळून २४१ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती.
प्रत्युत्तरात पंजाबचा संघ १७ षटकात १८१ धावांवर गारद झाला. यासह पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आरसीबीसाठी विराट कोहलीने प्रथम ९२ धावांची झंझावाती खेळी केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी तुफानी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ बळी घेतले. लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
या विजयानंतर आरसीबीने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १२ सामन्यांत १० गुण आहेत.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या २४१ धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात खूपच खराब झाली. प्रभासिमरन सिंग एकही धाव न काढता बाद झाला. त्यावेळी पंजाब किंग्जची धावसंख्या केवळ ६ धावा होती. मात्र यानंतर जॉनी बेअरस्टो आणि रिले रॉसो यांच्यात चांगली भागीदारी झाली. जॉनी बेअरस्टो आणि रिली रॉसो यांनी ६५ धावा जोडल्या.
जॉनी बेअरस्टो १६ चेंडूत २७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पण रिले रोसोने मोठमोठे फटके सहज मारले. या फलंदाजाने २७ चेंडूत ६१ धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकार मारले.
रिली रॉसो खेळत असताना पंजाब किंग्ज धावांचा पाठलाग सहज करेल असे वाटत होते. पण रिले रोसो पॅव्हेलियनमध्ये परतल्याने पंजाब किंग्जच्या आशांना मोठा धक्का बसला.
मात्र, त्यानंतर शशांक सिंह याने डाव सावरला होता. पण तो १९ चेंडूत ३७ धावांची खेळी करून धावबाद झाला. यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करन १६ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. त्यामुळे पंजाब किंग्जला ५० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
तत्पूर्वी, या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ७ बाद २४१ धावा केल्या. आरसीबीसाठी विराट कोहलीने ४७ चेंडूत सर्वाधिक ९२ धावा केल्या. तर रजत पाटीदारने २३ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिले.
याशिवाय कॅमेरून ग्रीन २७ चेंडूत ४६ धावा करून नाबाद परतला. पंजाब किंग्जकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ३ बळी घेतले. विद्वथ कावरेप्पाने २ विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग आणि सॅम करन यांनी १-१ विकेट घेतली.
संबंधित बातम्या