Khurchi Marathi Movie Teaser Out: मराठी मनोरंजन विश्वात आता एका धडाकेबाज चित्रपटाची चर्चा सुरू आहे. 'खुर्ची' असे या चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटाच्या टीझरची हवा सगळीकडेच पाहायला मिळत आहे. 'चर्चा तर होणारच! जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी', या दमदार संवादाने सुरु होणाऱ्या टीझरने अक्षरशः सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. सोशल मीडियावर घोंगावणार हे सत्तेचं वादळ आता चांगलंच वाढताना दिसत आहे. येत्या १२ जानेवारी २०२४ला 'खुर्ची'चा खेळ मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.
'खुर्ची' या चित्रपटाची हवा सर्वत्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या टीझरने अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. सत्ता, खुर्ची, खून, मारामाऱ्या आणि रक्त या सगळ्याच्या अवतीभोवती फिरणार कथानक नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवेल. टीझरमधील कलाकारांच्या भेदक नजरा चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. टीझरमध्ये पाहायला मिळाल्याप्रमाणे नेमकं सत्तेच्या खुर्चीवर कोण बाजी मारणार, हे चित्रपटगृहातच कळेल. या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे,आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
अभिनेता राकेश बापट चित्रपटाबाबत बोलताना म्हणाला की, 'नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर पाहून तुम्हाला कल्पना आली असेल की, नक्की आम्ही काय व कशा प्रकारचा राडा घातला आहे. एकूणच चित्रपट करताना खूप मज्जा आली.' तर, अभिनेता अक्षय वाघमारे चित्रपटाबाबत बोलताना म्हणाला की, ‘चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची झालेली हवा पाहून मी अचंबित झालो आहे. टीझरलाही प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. चित्रपटात काम करताना प्रचंड मज्जा आली. धमाल, मस्ती करत सीन शूट केले, एकूणच या चित्रपटात काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.’
खुर्चीसाठीची ही लढाई नेमकं कोण लढणार? चित्रपटातील सत्तेसाठीच्या या लढाईत खुर्ची कोणाला मिळणार? हे पाहणं रंजक ठरणार. 'खुर्ची’ हा जबरदस्त चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.