
Ankush Choudhary Birthday: मराठी मनोरंजन विश्वातील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अंकुश चौधरी याचे नाव देखील अग्रक्रमी आहे. मराठी मनोरंजन विश्वाचा हा लाडका सुपरस्टार अंकुश चौधरी आज (३१ जानेवारी) आपला ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. एका चाळीत वाढलेल्या मुलाचा चित्रपट सृष्टीपर्यंतचा हा प्रवास अतिशय संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. अंकुशला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. तो चाळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा. इथूनच त्याच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली होती.
अंकुश चौधरीचा जन्म एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला होता. घराची परिस्थिती तशी बेताची असल्याने, कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून अंकुश भाजी विकायचा. पण, अभिनयाप्रती असलेली ओढ अंकुशला शांत बसू देत नव्हती. अंकुश त्यांच्या चाळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी भाग घ्यायचा. इथूनच त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.
अंकुशला पहिली मोठी संधी मिळाली ती शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमातून... या कार्यक्रमात अंकुश अनेक कलाकारांसोबत अगदी शेवटच्या रांगेत नृत्य करायचा. याच कार्यक्रमादरम्यान अंकुश चौधरी याची भरत जाधव, केदार शिंदे व संजय नार्वेकर या कलाकार मित्रांशी छान गट्टी जमली. केदार शिंदेसोबत अंकुशने अनेक एकांकिका केल्या. पुढे या जोडीने मिळून अनेक धमाल सुपरहिट चित्रपट देखील केले. त्याच्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाने रंगभूमीवर तुफान कल्ला केला होता. याच नाटकाने अंकुश चौधरीला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली.
रंगभूमी गाजवल्यानंतर अंकुश मालिका विश्वाकडे वळला. ‘हसा चकट फू’ या विनोदी कार्यक्रमातून त्याने टीव्ही विश्वात पदार्पण केले. यानंतर त्याने अनेक मालिकांमधून काम केले. यानंतर त्याने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. ‘सावरखेड एक गाव’, ‘आई शप्पथ’, ‘मातीच्या चुली’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘संशय कल्लोळ’, ‘चेक मेट’, ‘गैर’, ‘ब्लफमास्टर’, 'डबल सीट', 'क्लासमेट', ‘गुरु’, ‘दगडी चाळ’ आणि ‘दुनियादारी’सारखे सुपरडुपर हिट चित्रपट त्याने केले आहेत.
संबंधित बातम्या
