The Kerala Story Collection Box Office Collection: सुदीप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने संपूर्ण देशभरात खळबळ माजवली आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात केली आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘शेहजादा’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. अवघ्या ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने मोठ्या व्यावसायिक चित्रपटांना मागे टाकले आहे. पहिल्या दिवशी बक्कळ कमाई करत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट २०२३च्या आतापर्यंतच्या सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.
या चित्रपटाला एकीकडे प्रेक्षकांचे प्रेम मिळत असतानाच दुसरीकडे विरोध होण्याचाही फायदा मिळत आहे. ‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची चांगलीच गर्दी होत आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे आता नुकतेच समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'द केरळ स्टोरी'ने पहिल्याच दिवशी ७.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र, हे सध्याचे सुरुवातीचे अंदाजे आकडे आहेत.
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट २०२३च्या टॉप ओपनिंग चित्रपटांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचाही चांगला फायदा मिळत आहे. यंदाच्या वर्षी दमदार सुरुवात करणाऱ्या या चित्रपटांच्या यादीत शाहरुख खानचा चित्रपट टॉपवर आहे. ‘पठान’ने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती. तर, सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट १५.८१ कोटी कमाईसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रणबीर कपूर-श्रद्धा कपूर यांचा ‘तू झुठी मैं मक्कार’ १५.७३ कोटींसह तिसर्या क्रमांकावर आणि अजय देवगणचा ‘भोला’ ११.२० कोटींसह चौथ्या क्रमांकावर आहे.
दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात ३ महिलांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांचे ब्रेनवॉश करून इस्लामिक धर्म स्वीकारायला लावला जातो. यानंतर त्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश होतो. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
संबंधित बातम्या