Pathaan Release: आदित्य चोप्रा निर्मित आणि सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ‘पठान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरला आहे. जागतिक बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल १०५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. बक्कळ कमाई करून, हिंदी चित्रपटांच्या इतिहासात हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता ‘पठान’च्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद होणार आहे. बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान याचा हा चित्रपट फाळणीनंतर बांगलादेशात प्रदर्शित होणारा पहिला हिंदी चित्रपट ठरणार आहे. ‘पठान’ हा चित्रपट १२ मे रोजी बांगलादेशमध्ये रिलीज होणार आहे.
याबद्दल बोलताना इंटरनॅशनल डिस्ट्रिब्युशनचे उपाध्यक्ष नेल्सन डिसोझा म्हणाले की, ‘सिनेमा नेहमीच राष्ट्रे, वंश आणि संस्कृतींना एकत्र आणणारी शक्ती आहे. सिनेमा नेहमीच देशाच्या सीमा ओलांडतो, लोकांना प्रेरणा देतो आणि त्यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जगभरात कोट्यवधींचा व्यवसाय करणाऱ्या पठानला आता बांगलादेशातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी मिळणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे.’
१९७१ नंतर अर्थात फाळणी झाल्यानंतर बांगलादेशात प्रदर्शित होणारा शाहरुख खानचा ‘पठान’ हा पहिला हिंदी चित्रपट ठरणार आहे. बॉलिवूड किंग असे बिरूद मिळवणाऱ्या शाहरुख खानचे बांगलादेशात खूप मोठे चाहते आहेत. ‘पठान’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपट मालिकेत ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘वॉर’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे.
शाहरुख खानचा 'पठान' हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ‘पठान’ हा चित्रपट आजही लाखोंची कमाई करत आहे. रिलीजच्या ४ महिन्यांनंतरही जगभरात ‘पठान’चा प्रभाव कायम आहे. ‘पठान’ अजूनही यूके, यूएस, ऑस्ट्रेलिया, यूएई आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये हाउसफुल कमाई करत आहे. ‘पठान’ चित्रपटाने भारतात ६५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तर, या चित्रपटाने परदेशात १००० कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे. बंगलादेशात रिलीज झाल्यावर या कमाईचा आकडा आणखी वाढणार आहे.
संबंधित बातम्या