मराठी बातम्या  /  elections  /  Navneet Rana : भाजप उमेदवार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जातप्रमाणपत्र वैध, निवडणुकीचा मार्ग मोकळा

Navneet Rana : भाजप उमेदवार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जातप्रमाणपत्र वैध, निवडणुकीचा मार्ग मोकळा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 04, 2024 12:42 PM IST

Navneet Rana Caste Certificate : अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. न्यायालयानं नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र वैध ठरवलं आहे.

नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र वैध; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं मोठा दिलासा
नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र वैध; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं मोठा दिलासा (PTI)

Navneet Rana Caste Certificate : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) वैध ठरवलं आहे. या संबंधीचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. राणा यांच्यासह भाजपसाठीही हा मोठा दिलासा मानला जात आहे.

नवनीत राणा या २०१९ मध्ये अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र, निवडून आल्यानंतर अडसूळ यांनी राणा यांच्या जातप्रमाणपत्राला आक्षेप घेतला होता. नवनीत राणा यांनी निवडणूक लढवण्यासाठी चुकीची जात दाखवली आहे. त्यांनी स्वत:ची जात मोची अशी सांगितली आहे. मात्र, त्या पंजाबी चर्मकार आहेत, असा दावा अडसूळ यांनी केला होता.

काय होता उच्च न्यायालयाचा निर्णय?

अडसूळ यांच्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. राणा यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून मोची जातीचा दाखला मिळवल्याचं उच्च न्यायालयानं ८ जून २०२१ रोजी नमूद केलं होतं. राणआ या 'शीख-चर्मकार' जातीच्या असल्याचं नोंदीवरून दिसतं, असं सांगत न्यायालयानं त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठापुढं त्यांच्या आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. दोन्ही न्यायमूर्तींनी एकमतानं उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल केला.

'२०१३ मध्ये मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी नवनीत राणा यांना मोची जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं. जातपडताळणी समितीनंही त्यास मान्यता दिली होती. उच्च न्यायालयात त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.

नवनीत राणा आज अर्ज भरणार

नवनीत राणा पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असून यावेळी त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आजच त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधीच सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दिलासा दिल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजपसाठीही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

राणा यांच्यासमोर मोठं आव्हान

अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी नवनीत राणा यांच्यापुढं महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बूब यांचं आव्हान आहे. त्याशिवाय, वंचित बहुजन आघाडीनं इथं आनंदराज आंबेडकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं इथं बहुरंगी लढत होणार आहे.

WhatsApp channel