ऱाज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्येही जागावाटपाचा घोळ सुरूच आहे. महायुतीचं कोडं काही प्रमाणात सुटत आलं असलं तरी वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार की, स्वबळावर लढणार याचा निर्णय गुलदस्त्यात आहे. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीने दिलेल्या ४ जागांचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर २६ मार्च रोजी अंतिम निर्णय जाहीर करण्यार असल्याचे म्हटले होते. आता महाविकास आघाडीसोबत जायचं का नाही याची घोषणा प्रकाश आंबेडकर उद्या (बुधवार) सकाळी करणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही, यावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीनंतर वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, वंचित आघाडीची मंगळवारी रात्री १० वाजता पुन्हा बैठक होणार आहे. ही बैठक महाविकास आघाडीच्या मुद्द्यावरील अंतिम बैठक असणार आहे. यात वंचितची आगामी रणनिती ठरवली जाईल. या बैठकीतील निर्णय उद्या सकाळी जाहीर केला जाईल.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, वंचित सोबत नसली तर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. संजय राऊत म्हणाले की, वंचित सोबत असो की नसो महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. आमची इच्छा आहे की, प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं, मात्र त्यांनी आमचा ४ जागांचा प्रस्ताव फेटाळला आहे. आम्ही अजूनही आशावादी आहोत की, ते महाविकास आघाडीमध्ये सामील होतील.
तसेच महाविकास आघाडीने सर्व शक्यतांचा विचार करून वंचित बहुजन आघाडीशिवाय आपल्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही. संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र आम्ही महाविकास आघाडीत असल्याने उद्या शिवसेना ठाकरे गटाची यादी जाहीर केली जाईल. संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी सर्व उमेदवार निश्चित केले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही तयारी पूर्ण झाली आहे. सर्व जागांवरील वाद मिटवण्यात आले आहेत.