Richest candidate : देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? संपत्तीचा आकडा ऐकून चक्रावून जाल!-lok sabha 2024 richest candidate pemmasani chandra sekhar from tdp in andhra pradesh see how much is the net worth ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Richest candidate : देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? संपत्तीचा आकडा ऐकून चक्रावून जाल!

Richest candidate : देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? संपत्तीचा आकडा ऐकून चक्रावून जाल!

Apr 23, 2024 05:28 PM IST

Lok Sabha Election 2024 Richest Candidate : देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या ठाकलेल्या उमेदवारांपैकी सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? चला जाणून घेऊया…

Richest candidate : देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? संपत्तीचा आकडा ऐकून चक्रावून जाल!
Richest candidate : देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? संपत्तीचा आकडा ऐकून चक्रावून जाल!

Lok Sabha Election 2024 Richest Candidate : देशभरात सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार आहे. त्यामुळं बहुतेक पक्षांचे उमेदवार जाहीर झाले असून उमेदवारी अर्जही दाखल केले गेले आहेत. आतापर्यंत दाखल केल्या गेलेल्या अर्जांतून उमेदवारांची वैयक्तिक संपत्तीही समोर आली आहे. देशातील सर्वात श्रीमंत उमेदवाराचंही नाव समोर आलं आहे.

आतापर्यंतच्या माहितीनुसार, तेलुगू देसम पक्षाचे पेमसानी चंद्रशेखर हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. चंद्रशेखर यांनी आपल्या कुटुंबाची एकूण संपत्ती ५७८५ कोटी रुपये असल्याचं निवडणूक प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रामुळं ते देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. अर्थात, चंद्रशेखर यांच्या कुटुंबावर अमेरिकन बँकेचं ११३८ कोटी रुपयांचं कर्ज असल्याचंही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पेमसानी चंद्रशेखर हे आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची स्वतःची संपत्ती २४४८.७२ कोटी रुपये आहे, तर त्यांच्या पत्नीकडे २३४३.७८ कोटी रुपये आणि मुलांकडे सुमारे १ हजार कोटी रुपये आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबावर अमेरिकेच्या जेपी मॉर्गन चेस बँकेचे ११३८ कोटी रुपयांचं कर्ज आहे.

कोण आहेत चंद्रशेखर?

पेमसानी चंद्रशेखर हे व्यवसायानं डॉक्टर आहेत. त्यांचं कुटुंब मूळचं गुंटूर जिल्ह्यातील बुरीपलेम इथलं आहे. त्यांचे वडील नरसरावपेठेत हॉटेल चालवायचे. चंद्रशेखर यांनी उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस केलं आहे. त्यानंतर ते पदव्युत्तर पदवीसाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतील वैद्यकीय परवाना परीक्षेत (एमएलई) वरचा क्रमांक मिळवल्यानंतर त्यांनी एज्यु-टेक ही कंपनी सुरू केली आणि काही काळ डॉक्टरकीचा व्यवसायही केला.

डॉ.शेखर यांची बहुतांश मालमत्ता अमेरिकेत आहे. आर्थिक वर्ष २०१२-२३ मध्ये त्यांचं भारतातील उत्पन्न ३.६८ लाख रुपये होते, तर त्याच कालावधीत त्यांनी आपल्या पत्नीसह एकत्रितरित्या ६०५.५ कोटी रुपये कमावले. त्यांनी २०२० आणि २०२१ मध्ये अनुक्रमे ६४३ कोटी आणि ५९४ कोटी रुपयांचे उत्पन्न अमेरिकी कर अधिकाऱ्यांकडं जाहीर केलं होतं.

२०१४ पासून मागत होते उमेदवारी

डॉ. चंद्रशेखर हे मागील दहा वर्षांपासून उमेदवारीसाठी इच्छुक होते. २०१४ सालीही त्यांनी गुंटूरमधून खासदारकीचं तिकीट मागितलं होतं. मात्र, त्यांना ते मिळू शकलं नाही. गुंटूरचे दोन वेळा खासदार राहिलेले गल्ला जयदेव यांनी राजकारण सोडल्यानंतर यावेळी चंद्रशेखर यांना संधी मिळाली आहे. चंद्रशेखर यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांचा सामना राज्यातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचे उमेदवार के. व्यंकट रोसय्या यांच्याशी होणार आहे.

Whats_app_banner