Vaibhav Naik : आता सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या ताब्यात देण्याचा डाव; ठाकरेंच्या आमदारांचा भाजप व नारायण राणेंवर आरोप
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Vaibhav Naik : आता सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या ताब्यात देण्याचा डाव; ठाकरेंच्या आमदारांचा भाजप व नारायण राणेंवर आरोप

Vaibhav Naik : आता सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या ताब्यात देण्याचा डाव; ठाकरेंच्या आमदारांचा भाजप व नारायण राणेंवर आरोप

Apr 23, 2024 04:56 PM IST

Vaibhav Naik slams Narayan Rane : मुंबई प्रमाणेच सिंधुदुर्गात गुजराती माणसाचं वर्चस्व निर्माण करून हा जिल्हा त्यांच्या ताब्यात देण्याचा डाव आहे, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

आता सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या ताब्यात देण्याचा डाव; ठाकरेंच्या आमदारांचा नारायण राणेंवर आरोप
आता सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या ताब्यात देण्याचा डाव; ठाकरेंच्या आमदारांचा नारायण राणेंवर आरोप

Vaibhav Naik : 'भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्थानिक मराठी माणसांना डावलून गुजराती लोकांना पुढं आणलं जात आहे. व्यवसायानंतर आता राजकारणातही गुजराती लोक शिरकाव करत आहेत. मुंबईनंतर आता सिंधुदुर्ग गुजराती माणसाच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नारायण राणे (Narayan Rane) हे त्यासाठी मदत करत आहेत,' असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे निवडणूक लढवत आहेत. नुकतीच राणे यांनी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतली. त्यावरून वैभव नाईक यांनी राणे व भाजपवर जोरदार टीका केली आहे.

मुंबईनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसाय करण्यासाठी गुजराती लोक आले आहेत. भाजपनं सुरुवातीला गुजराती लोकांची संघटना तयार केली. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतली. केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजप पक्ष आणि नारायण राणे गुजराती लोकांना जिल्ह्याच्या राजकारणात आणून स्थानिक कोकणी मराठी माणसाचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.

रिफायनरी प्रकल्पाच्या जमिनी गुजरात्यांना

नारायण राणे यांनी गुजराती व्यावसायिकांसाठी सिंधुदुर्ग ते गुजरात विमानसेवा सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या काळात चिपी विमानतळावरून अनियमित विमान सेवा सुरू आहे. मात्र ही विमान सेवा सुरळीत करण्याऐवजी नारायण राणे हे मोदी, शहा आणि गुजरात्यांची चापलुसी करत आहेत. याच गुजराती लोकांना रिफायनरी प्रकल्पाच्या जमिनी मिळवून देण्यासाठी नारायण राणे यांनी कमिशन घेतलं. त्यामुळं राणेंना त्यांचा पुळका आहे, असंही वैभव नाईक म्हणाले.

राणेंचा हा डाव हाणून पाडा!

नारायण राणे यांची खासदारकीची उमेदवारी जिल्ह्यातील स्थानिक मराठी कोकणी माणसाच्या मुळावर येणारी आहे. मुंबई प्रमाणे सिंधुदुर्गची अवस्था होऊ नये यासाठी भाजपला आताच रोखणं गरजेचं आहे. कोकणी मराठी माणूस भाजपचा आणि राणेंचा हा डाव हाणून पाडेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

गुजराती लोकांना नाईक यांचा इशारा

गुजराती बांधवांनी व्यवसायापुरतंच मर्यादित राहावं. राजकारणात ढवळाढवळ करू नये. अन्यथा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी गाठ आहे. सिंधुदुर्गात गुजराती लोकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीनं आम्ही त्यांना उत्तर देऊ, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या