औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट व उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांनी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती कोणाला मैदानात उतरवणार याची चर्चा सुरू होती. अखेर शिंदे गटाकडून रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली. त्यानंतर आज संदीपान भुमरेंनी तीन दिवस आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Sandipan bhumare declare asset) उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात भुमरेंनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. मंत्रीपदावर आल्यानंतर भुमरेंच्या संपत्तीच गेल्या ४ वर्षात अडीचपटीने वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमने-सामने आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची संपत्ती मंत्रिपदाच्या काळात तब्बल अडीच पटीने वाढली आहे. त्यांच्याकडील मालमत्तेचे बाजारमूल्य ५.७० कोटींच्या वर आहे. मात्र, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) भुमरेंपेक्षा अधिक श्रीमंत आहेत. भुमरेंची श्रीमंती सत्तेत गेल्यापासून मात्र मागील पाच वर्षांत झपाट्याने वाढली आहे, तर खैरेंची जैसे थे आहे.
उमेदवारी अर्ज सादर करताना खैरे यांनी स्वतःच्या नावावर असलेली व १९७९ साली खरेदी केलेली २० हजारांची फियाट कार तर पत्नीच्या नावे सफारी कार दाखवली असून कारची किंमत ५० हजार सांगितली आहे. तर, भुमरेंकडे २८ लाखांची फॉर्च्यूनर कार आहे. दोन्ही शिवसैनिकांकडे समान पातळीवर सोने असल्याचे दिसते. चंद्रकांत खैरे यांच्याकडे ४३ तोळे, तर भुमरेंकडे४५तोळे सोने आहे. दरम्यान, २०१९ साली संदीपान भुमरेंची संपत्ती २ कोटी होती मात्र गेल्या ४ वर्षाच्या काळात त्यांच्या संपत्तीत तब्बल अडीच पटींनी वाढ झाली आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर होताना राजकीय नेत्यांची गडगंज संपत्तीचे आकडे सार्वजनिक होत आहेत. विशेष म्हणजे अधिकृत असलेली ही संपत्तीही सर्वसामान्यांचे डोळे विस्फारणारी आहे. साताऱ्याचे राजे व महायुतीचे उमेदवार उदयनराजेंची संपत्ती अब्जावधीच्या घरात आहे. त्याचबरोबर कोल्हापूर मतदारसंघातील राजघराण्यातील उमेदवार शाहू महाराज यांची संपत्तीही शेकडो कोटींच्या घरात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर एमआयएमकडून इम्तियाज जलीलही मैदानात आहेत. यामुळे यंदाही छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार आहे.
संदिपान भुमरेंची संपत्ती किती?
-रोख ६३ हजार रुपये
-४५ तोळे सोने
- शेती, प्लॉट आणि घर अशी ४ कोटींची मालमत्ता
-विविध बँकांचे १ कोटी ६६ लाख रुपयांचे कर्ज
-टोयाटा फॉर्च्युनर अलिशान कार
चंद्रकांत खैरेंची संपत्ती किती?
-रोख रक्कम ९५ हजार रुपये
-४३ तोळे सोने, १ किलो ६०० ग्रॅम चांदी
-प्लॉट, घर आणि इतर मालमत्ता मिळून ८ कोटींची प्रॉपट्री
-विविध बँकांचे २ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज
-फियाट कंपनीची १९७९ मध्ये घेतलेली कार
संबंधित बातम्या