भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने आज शुक्रवारी (२६ एप्रिल) बेंगळुरू येथे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी राहुल द्रविड अगदी साध्या लूकमध्ये दिसला. द्रविड स्लीपर आणि हाफ पॅन्ट परिधान करून मतदान केंद्रावर आला होता. टीम इंडियाच्या हेड कोचने रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
टीम इंडियाचा हेड कोच मतदानासाठी रांगे उभा असलेला पाहून, सोशल मीडियावर त्याच्या साधेपणाचे कौतुक होत आहे. तसेच, द्रविडच्या या साध्या शैलीने मोठा संदेश दिला आहे. मतदानानंतर, द्रविडने माध्यमांशी बोलताना आशा व्यक्त केली, की बेंगळुरूचे लोक मतदानासाठी मोठ्या संख्येने पुढे येतील.
द्रविड म्हणाला, की “मी मतदान केले आहे, ही आपल्या सर्वांसाठी आपल्या लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी आहे. पोलिसांनी अतिशय चांगले काम केले आहे, व्यवस्था उत्तम आहे. मला आशा आहे की बेंगळुरू मतदानाच्या बाबतीत विक्रम करेल. सर्वांनी पुढे यावे, तुम्ही, मीडियाने जनतेला संदेश द्यावा जेणेकरून यावर पुरेशी चर्चा होईल जेणेकरून ते मोठ्या संख्येने पुढे येतील”.
द्रविडशिवाय माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेनेही पत्नीसह बेंगळुरूमध्ये जाऊन मतदान केले. कुंबळेने X वर फोटो शेअर केला आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या इंडियन प्रीमियर लीगवर (IPL 2024) लक्ष ठेवून आहे. भारत एप्रिलच्या अखेरीस T20 विश्वचषक २०२४ साठी आपल्या शीर्ष १५ खेळाडूंची घोषणा करेल.
द्रविडने इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यानच सांगितले होते, टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडताना आयपीएलमधील कामगिरीचा आधार घेतला जाईल.
IPL २०२४ ही हार्दिक पांड्या, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा सारख्या अनेक भारतीय खेळाडूंसाठी चढ-उतारांची स्पर्धा आहे, यावेळी टीम इंडियाच्या निवडीत अनेक आश्चर्यकारक नावांचा समावेश केला जाऊ शकतो. २०२२ साली ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. मात्र यावेळी भारतीय संघ जेतेपद पटकावण्याची आशा बाळगून आहे.
संबंधित बातम्या