आयपीएल २०२४ चा ४७ वा सामना आज (२९ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डनवर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात ९ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात केकेआरने १६.३ षटकात १५७ धावा करत सामना जिंकला. केकेआरकडून फिलिप सॉल्टने स्फोटक कामगिरी केली. सॉल्टने ३३ चेंडूंचा सामना करताना ६८ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि ५ षटकार मारले. श्रेयस अय्यरने नाबाद ३३ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने नाबाद २६ धावा केल्या.
दिल्लीकडून गोलंदाजीत अक्षर पटेलने चांगली कामगिरी केली. त्याने २ बळी घेतले. तर लिझार्द विल्यम्सने १ बळी घेतला.
कोलकाता नाईट रायडर्सचा चालू आयपीएल मोसमातील ९ सामन्यांमधील हा सहावा विजय ठरला. म्हणजेच कोलकाताने विजयाचा षटकार ठोकला आहे. दिल्लीचा हा ११ सामन्यातील सहावा पराभव ठरला.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचे सर्वच फलंदाज आज फ्लॉप ठरले. पॉवरप्लेमध्ये संघाने ३ गडी गमावले होते. पृथ्वी शॉ १३ धावा, मॅकगर्क १२ धावा करून आणि शाई होप ६ धावा करून बाद झाले.
यानंतर पुढच्याच षटकात दिल्लीने चौथी विकेटही गमावली. हर्षित राणाने अभिषेक पोरेलला ६८ धावांवर बाद केले. पोरेला १५ चेंडूत केवळ १८ धावा करता आल्या. यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी २५ धावांची भागीदारी केली जी वरुण चक्रवर्तीने मोडली. त्याने कर्णधार ऋषभ पंतला बाद केले. तो २० चेंडूत २७ धावा करून परतला.
यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ट्रिस्टन स्टब्स जास्त काळ विकेटवर टिकू शकला नाही. अवघ्या ४ धावा करून तो बाद झाला. या सामन्यात अक्षर पटेलने ३५, कुमार कुशाग्रने १ धाव, रसिक सलामने ८ धावा, कुलदीप यादवने ३५ धावा केल्या.
गोलंदाजीत केकेआरसाठी वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी केली. त्याने ३ बळी घेतले. वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनी २-२ बळी घेतले. सुनील नरेन आणि स्टार्कने १-१ विकेट घेतली.