GT vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा पाचवा सामना (२४ मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६८ धावा केल्या होत्या.
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना अतिशय रोमांचक झाला. यामध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने अवघ्या ६ धावांनी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
एकवेळ मुंबई हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण शेवटच्या षटकांमध्ये गुजरातचे फिरकी गोलंदाज साई किशोर आणि राशीद खान यांनी टिच्चून गोलंदाजी केली. तसेच, मोहित शर्मा आणि स्पेन्सर जॉन्सन या वेगवान गोलंदाजांनी त्यांना उत्तम साथ दिली.
या सामन्यात रोहित शर्मा आणि डेव्हॉल्ड ब्रेविस यांनी मुंबईकडून दमदार कामगिरी केली. मात्र, अखेरच्या षटकात उमेश यादवने हार्दिक पांड्या आणि पियुष चावलाचे बळी घेत सामन्याचा मार्गच बदलून टाकला.
शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची गरज होती. चेंडू उमेश यादवच्या हातात होता. तर फलंदाजी हार्दिक पांड्या आणि शम्स मुलानी होती. हार्दिकने पहिल्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार वसूल केला. पण तिसऱ्या चेंडूवर उमेशने शॉर्ट बॉलवर हार्दिकला झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या पियुष चावलालादेखील उमेशने शॉर्ट बॉलवर झेलबाद केले. यानंतर उमेशने दोन चेंडूत दोन धावा देत सामना ६ धावांनी गुजरातकडे फिरवला.
गुजरातच्या १६९ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने ९ बाद १६२ धावा केल्या. संघासाठी इम्पॅक्ट प्लेयर डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली आणि रोहित शर्माने ४३ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने २५ धावा केल्या.
गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. याशिवाय गिलने ३१ धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने १४ धावांत ३ बळी घेतले. जेराल्ड कोएत्झीला २ आणि पियुष चावलाला १ विकेट मिळाला.
तत्पूर्वी, गुजरातने ३१ धावांवर पहिली विकेट गमावली. जसप्रीत बुमराहने रिद्धिमान साहाला (१९) क्लीन बोल्ड केले. यानंतर ६२ धावांवर शुबमन गिलच्या (३१) रूपाने संघाने दुसरी विकेट गमावली. पियुष चावलाने त्याला शिकार बनवले. गुजरातने १०४ धावांवर उमरझाईच्या (१७) रूपाने तिसरी विकेट गमावली.
शेवटी राहुल तेवतियाने १५ चेंडूत २२ धावा करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.