आयपीएल २०२४ चा २९ सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (CSK) हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला. या सामन्यात मुंबईचा २० धावांनी पराभव झाला.
या सामन्यात चेन्नईने मुंबईसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, याला प्रत्युत्तर देताना मुंबई ६ विकेट गमावून केवळ १८६ धावाच करू शकली.
त्यांच्यासाठी रोहित शर्माने ६३ चेंडूत १०५ धावांची नाबाद शतकी खेळी केली. हिटमॅन एका टोकाला उभा राहिला, पण दुसऱ्या बाजूचा एकही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाही. रोहितने या झंझावाती खेळीत ११ चौकार आणि ५ षटकार मारले, पण मुंबई इंडियन्सचा पराभव टाळता आला नाही.
वास्तविक, रोहित शर्माला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. दुसऱ्या टोकावरील फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. तिलक वर्माने २० चेंडूत ३१ धावांची खेळी खेळली. तर इशान किशनने १५ चेंडूत २३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद झाला. याशिवाय टीम डेव्हिड आणि रोमारिया शेफर्डसारख्या फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ लक्ष्यापासून २० धावा दूर राहिला.
तर दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सच्या वेगवान गोलंदाजांनी अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. मथिशा पाथिरानाने ४ बळी घेत संपूर्ण खेळच उलटवून टाकला. पाथीरानाने इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि रोमॅरियो शेफर्ड यांना आपला बळी बनवले. मुंबईकडून रोहितशिवाय तिलक वर्माने ३१ धावा केल्या. तर चेन्नईकडून पाथीराना व्यतिरिक्त तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
चेन्नई सुपर किंग्जकडून महेंद्रसिंग धोनी सीएसकेसाठी शेवटच्या षटकात फलंदाजीला आला. येताच त्याने ४ चेंडूत नाबाद २० धावा केल्या. त्याने हार्दिक पंड्याच्या या षटकात सलग ३ षटकार मारले.
याआधी ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी अर्धशतके झळकावली. तत्पूर्वी, चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीला फलंदाजीला आलेला अजिंक्य रहाणे केवळ ५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी रचिन रवींद्रलाही २१ धावा करता आल्या. यानंतर दुबे आणि गायकवाड यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी झाली, जी हार्दिक पांड्याने मोडली. त्याने सीएसकेच्या कर्णधाराला १५० धावांवर बाद केले. या सामन्यात ऋतुराजने ४० चेंडूंचा सामना करत ६९ धावा केल्या.
यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ५ षटकार आले. संघाला चौथा धक्का डॅरिल मिशेलच्या रूपाने बसला. तो १७ धावा करून माघारी परतला. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पंड्याने त्याला नबीकरवी झेलबाद केले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या धोनीने शेवटच्या ४ चेंडूत २० धावा केल्या. त्याने लागोपाठ ३ चेंडूत ३ षटकार ठोकले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट ५०० चा होता.