MMRC ACES Contract : मेट्रो रेल्वे जमिनीवरून धावत असो किंवा बोगद्यातून, मुंबईकर प्रवाशांच्या मोबाइल किंवा अन्य डिजिटल सेवांमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. कारण, मेट्रोच्या प्रवाशांना डिजिटल सेवा पुरवण्यासाठी अद्ययावत पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) आणि सौदी अरेबियाच्या ACES कंपनीची उपकंपनी असलेल्या एसेस इंडिया प्रा. लिमिटेडमध्ये या संदर्भात करार झाला आहे. मुंबई मेट्रो लाइन ३ साठी हा करार आहे. सौदीतील रियाध इथं नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, आर. रमणा यांच्यासह अनेक अधिकारी व कंपनीची प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
'मुंबई मेट्रो लाइन ३ साठी मोबाईल सेवा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ACES इंडियासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. पायाभूत सुविधांमुळं आता मेट्रो-३ च्या प्रवाशांना अखंडित मोबाइल कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होईल, असं एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितलं.
‘ACES ही डिजिटल पायाभूत सुविधा पुरवणारी जागतिक पातळीवरील एक आघाडीची कंपनी आहे. कंपनीकडं अशा कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. एमएमआरसी सोबत एसेसची झालेला सहकार्य करार हा लाखो मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखद करेल. प्रवाशांच्या डिजिटल सेवेत कोणताही अडथळा येणार नाही,’ असा विश्वासही अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.
एमएमआरसी व एसेस इंडियामध्ये झालेला हा करार १२ वर्षांसाठी आहे. त्या अंतर्गत एसेस इंडिया अद्ययावत ४जी आणि ५जी तंत्रज्ञानासह, २७ मेट्रो स्थानकं, प्लॅटफॉर्म्स, बोगद्यांसह एकूण ३३.५ किलोमीटरच्या पट्ट्यात दरवर्षी कोट्यवधी प्रवाशांना मोबाइल सेवेसाठी पायाभूत सुविधा पुरवेल. विनाअडथळा कव्हरेज, अल्ट्रा-हाय स्पीड आणि उत्तम अनुभव हे एसेसच्या पायाभूत सुविधांचं वैशिष्ट्य असेल.
संबंधित बातम्या