What is FPO : आर्थिक बाबतीत अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीनं सध्या एफपीओ ऑफर आणली आहे. या एफपीओला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एफपीओ संकल्पनेची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. काय आहे ही संकल्पना? एफपीओ आणि आयपीओ यात नेमका काय फरक असतो? जाणून घेऊया…
एफपीओ अर्थात फॉलो-ऑन पब्लिक ऑफर. शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून शेअरच्या स्वरूपात नवीन ऑफर आणणे म्हणजे एफपीओ. एफपीओ जारी करणारी कंपनी शेअर मार्केटमध्ये आधीपासूनच सूचीबद्ध असते. अतिरिक्त भांडवल उभे करण्यासाठी अशा कंपनीकडून इक्विटीची ऑफर दिली जाते. खेळते भांडवल उभारण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपन्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफर देऊ शकतात.
एफपीओचे दोन प्रकार आहेत. डायल्यूटिव्ह फॉलो-अप पब्लिक ऑफर आणि नॉन-डायल्यूटिव्ह फॉलो-अप पब्लिक ऑफर असे एफपीओचे दोन प्रकार आहेत.
डिल्युटिव्ह एफपीओमध्ये अधिक भांडवलाच्या उभारणीसाठी नवीन शेअर्स विक्रीसाठी काढले जाऊ शकतात आणि नॉन-डिल्यूटिव्ह एफपीओमध्ये भागधारक खासगी मालकीचे स्वत:कडील शेअर्स विक्रीस काढतात. त्यामुळं समभागांची एकूण संख्या वाढत असली तरी कंपनीचं मूल्य तेवढंच राहिल्यानं एफपीओमध्ये प्रति शेअर उत्पन्नावर (EPS) परिणाम होतो.
आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा एफपीओमध्ये गुंतवणूक करणं तुलनेनं कमी जोखमीचं असतं. कारण एफपीओ जाहीर झाल्यावर शेअर बाजारातील कंपनीच्या मागील कामगिरीची आकडेवारी उपलब्ध असते. मात्र, आयपीओच्या तुलनेत एफपीओमधील गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यताही कमी असते.
एफपीओसाठी अर्ज करण्याची पद्धत आयपीओसाठी अर्ज करण्यासारखीच म्हणजे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स (आरआयआय) वाटपांतर्गत अर्ज करण्यासारखीच आहे. पॅन कार्ड आणि डिमॅट खाते असलेली कोणतीही प्रौढ व्यक्ती ट्रेडिंग सुरू करू शकते. ट्रेडर्स स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतात किंवा एखाद्याच्या बँकेतून अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अकाउंट (एएसबीए) सुविधेद्वारे खरेदी करू शकतात.
आयपीओ आणि एफपीओमध्ये किती गुंतवणूक करायची किंवा करायची की नाही हे एखाद्या व्यक्तीची आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीचे स्वतःचे फायदे आणि मर्यादा असतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बाजार आणि कंपनीची मूलभूत समज महत्त्वाची असते.
(डिसक्लेमर: हा लेख शेअर बाजारातील विविध संकल्पनांची माहिती देणारा आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी आपल्या खासगी सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)