मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : अक्षय तृतीयेला या ५ राशींवर होणार धनवर्षाव! पाहा आजच्या लकी राशी

Lucky Zodiac Signs : अक्षय तृतीयेला या ५ राशींवर होणार धनवर्षाव! पाहा आजच्या लकी राशी

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 10, 2024 10:23 AM IST

Lucky Rashi Bhavishya 10 May 2024 : आज १० मे २०२४ शुक्रवार रोजी, चंद्र आणि गुरुच्या संयोगाने आज गजकेसरी योग घटित होत आहे. तसेच आज अत्यंत शुभ समजला अक्षय तृतीयेचा दिवस आहे. आज कोणत्या राशीचे लोक लकी ठरतील जाणून घ्या.

लकी राशी, नशीबवान राशीभविष्य १० मे २०२४
लकी राशी, नशीबवान राशीभविष्य १० मे २०२४

आज शुक्रवार १० मे २०२४ रोजी मेष राशीत शुक्र आणि सूर्य विराजमान आहेत. तर दुसरीकडे वृषभ राशीत गुरु आणि चंद्र स्थानापन्न आहेत. चंद्र आणि गुरुच्या संयोगाने आज गजकेसरी योग घटित होत आहे. तसेच आज अत्यंत शुभ समजला अक्षय तृतीयेचा दिवस आहे. आजच्या दिवशी जुळून आलेल्या या सर्व शुभ योगांचा शुभ परिणाम राशीचक्रातील काही राशींवर होणार आहे. पाहूया आजच्या ५ लकी राशी कोणत्या आहेत.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आज शुक्रवार अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या करिअरला नवी उभारी मिळू शकते. तुमच्या कलागुणांनी इतरांनी प्रभावी करण्यात यशस्वी व्हाल. रखडलेल्या कार्ये पूर्ण करुन तुम्ही आज नव्या कार्यांची सुरुवात कराल. मनासारख्या गोष्टी घडत असल्यामुळे अंगात एक नवी ऊर्जा संचारेल. हातातून धार्मिक कार्य घडतील. आरोग्याची काळजी घ्या अन्यथा थकवा जानवेल. विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक तणावापासून मुक्ती मिळेल. व्यावसायिकांना आज अनेक दिवसांपासून अडलेली बोलणी पूर्ण करण्याची संधी मिळेल.

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. एखाद्या गोष्टीमधून अनपेक्षित पैसे प्राप्त होतील. त्यामुळे आनंदात आणखी भर पडेल. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. महत्वाच्या कार्यांत धडाडीने सहभाग घ्याल. त्यामुळे तुमचा नावलौकिक वाढेल. मात्र आरोग्यावर लक्ष द्यावे लागेल अथवा जुनी दुखणी उद्भवण्याची शक्यता आहे. आनंदाच्याभरात तडकाफडकी निर्णय घेणे टाळा.अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभामुळे नातेवाईकांशी गाठीभेटी जुळून येतील.

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. व्यावसायिकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन व्यवसायात स्थिरता येईल. कोणत्याही महत्वाच्या कामात तुम्हाला वडिलांचे सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे मनावरचा पूर्ण ताण नाहीसा होईल. अनेक दिवसांपासून कोर्टात सुरु असलेल्या गोष्टींमध्ये यश येईल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल. आरोग्य उत्तम राहिल्याने उत्साह जाणवेल. जोडीदारासोबत वेळ उत्तम जाईल. त्यामुळे नात्यात आणखी पारदर्शकता येईल. प्रेम वाढीस लागेल. घर अथवा जमिनीबाबत सुरु असलेली बोलणी आज पूर्ण होऊ शकते. आरोग्याबाबत सुरु असलेल्या समस्यांपासून आज बऱ्यापैकी आराम मिळेल.

तूळ

तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगल्या अनुभवांचा असणार आहे. दिवसभर सकारात्मक गोष्टी घडतील. कामानिमित्त प्रवास करण्याचा योग येईल. प्रवासादरम्यान काही महत्वाच्या गोष्टी समजतील. नोकरदारवर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. घरात चैनीच्या वस्तूंमध्ये वाढ होईल. एखाद्याला दिलेले वचन आज पूर्णत्वास न्याल. त्यामुळे इतरांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. व्यवसायात प्रगती होऊन धनप्राप्ती होईल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. अध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमेल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आज अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत लाभदायक असणार आहे. लिखाण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी जुळून येतील. जुन्या आठवणीत रमाल. मित्रांसोबत वेळ उत्तम जाईल. नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. हातात घेतलेल्या कामात मनासारखे यश येईल. आत्मविश्वासात भर पडेल. समोर आलेल्या प्रत्येक गोष्टींचा चौकसवृत्तीने विचार कराल. त्याचा फायदाच होणार आहे.

WhatsApp channel