मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup 2022: वसीम-वकार असं वागणं बरं नव्हं... खेळाडूंवरील कमेंट्स ऐकून चाहत्यांची सटकली

T20 World Cup 2022: वसीम-वकार असं वागणं बरं नव्हं... खेळाडूंवरील कमेंट्स ऐकून चाहत्यांची सटकली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 19, 2022 02:57 PM IST

wasim akram and waqar younis- T20 World Cup 2022: वर्ल्डकपमधील क्वालिफायर सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्या सामन्यानंतर पाकिस्तानी माजी दिग्गज खेळाडूंनी वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी स्कॉटलंडच्या खेळाडूची खिल्ली उडवली आहे.

T20 World Cup 2022
T20 World Cup 2022

ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक सुरू झाला असून सुरुवातीच्या काही सामन्यांचे धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. मात्र यादरम्यान एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानावर एका स्कॉटिश खेळाडूच्या हातात एक चिठ्ठी दिसली. यावर पाकिस्तानच्या दोन दिग्गज खेळाडूंनी स्कॉटलंडच्या खेळाडूंची खिल्ली उडवली आहे. आता याचा खूप निषेध केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अलीकडेच स्कॉटलंडने टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजचा ४२ धावांनी पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यात स्कॉटलंडचा हिरो फिरकी गोलंदाज मार्क वॅट होता, ज्याने १२ धावांत ३ बळी घेतले. सामन्यादरम्यान तो खिशात एक पत्रक घेऊन फिरत होता, ज्यावर त्याने त्याचा प्लॅन लिहिला होता.

त्या चिठ्ठिवर फलंदाजाच्या स्लॉटमध्ये चेंडू टाकू नका, असे लिहिले होते. मार्क वॅट जेव्हा खिशातून चिठ्ठितला मजकूर वाचत होता, त्यावेळचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या फोटोवर पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी खिल्ली उडवली.

वकार-वसीमने उडवली स्कॉटीश खेळाडूची खिल्ली

पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील एका चर्चेदरम्यान वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब मलिक आणि मिसबाह-उल-हक यांनी याबाबत चर्चा केली. वसीम अक्रमने सुरुवात केली आणि स्कॉटिश खेळाडूची खिल्ली उडवली. वसीम अक्रम म्हणाला, ‘मला वाटले की त्याच्या आईने त्याला एक किलो बर्फ आणि तीन लिंबू आणायला सांगितले होते’.

मध्येच व्यत्यय आणत मिसबाह-उल-हक म्हणाला की, जर आपण गांभीर्याने बोललो तर तो फलंदाजांसाठी मॅचअप आहे, ज्यामध्ये कोणत्या फलंदाजाला कोणता चेंडू टाकायचा हे लिहिलेले असते. वसीम अक्रम म्हणाला की, गोलंदाज म्हणून मला कोणत्याही चिठ्ठीची  गरज नाही. यादरम्यान वकार युनूसने म्हणाला की, त्याला काही प्रकारचा स्मृतिभ्रंश किंवा विसराळूपणाचा आजार असू शकतो, ज्यामुळे त्याला काही गोष्टी आठवणीत ठेवण्यासाठी या चिठ्ठिचा आधार घ्यावा लागत असेल.  शेवटी शोएब मलिक म्हणाला की, कोणत्या फलंदाजाला कोणता चेंडू टाकायचा, हे यावरूनच ठरवले गेले असावे.

सोशल मीडियावरुन वसीम-वकारवर  टीका

वसीम अक्रमने याच व्हिडिओमध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू निकोलस पूरनची देखील खिल्ली उडवली. मला त्या कागदावर निकोलस पुरनचे नाव दिसले, असे शोएब मलिकने सांगितले. तेव्हा यावर पुरनची खिल्ली उडवत अक्रमने म्हटले की, “मला तर पूरनच दिसत नाही, त्याचे नाव काय दिसणार”. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर बरीच टीका झाली. काही युजर्सने लिहिले की, वसीम अक्रम, वकार युनूस यांना लाज वाटली पाहिजे की ते खेळाडूसाठी अशी भाषा वापरत आहेत. याशिवाय अनेक युजर्सनी लिहिले की, एखाद्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करणे चुकीचे आहे आणि दिग्गज खेळाडूंनी तसे करू नये.

WhatsApp channel