Vijay Chaudhari DGP medal announced : कुस्तीचा आखाडा गाजवणारे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलीसांचे क्षेत्रही गाजवत आहेत. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधिक्षक असलेले विजय चौधरी यांना कुस्तीत दमदार कामगिरी दाखवल्याबद्दल 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह ' जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पुरस्काराची घोषणा केली. राज्य पोलीस विभागात विविध पदांवर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणार्या कर्तृत्ववान पोलीसांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हॅट्रिक करणार्या विजय चौधरी यांनी महाराष्ट्र पोलीस दलात दोनवेळा सुवर्णपदक जिंकले. तसेच २०२३ साली कॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावले होते.
पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर, ‘भविष्यातील मोठ्या कुस्ती स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव असेच उंचाविण्यासाठी मी अथक परिश्रम घेत राहीन,’ अशी प्रतिक्रिया विजय चौधरी यांनी दिली.
पोलीस खात्याचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विजय चौधरी यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व सन्मानचिन्ह विजेत्यांचे अभिनंदन केले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जयजीत सिंह, निकेत कौशिक, विश्वास नांगरे पाटील, अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे विजय चौधरी पोलीस खात्यातही आपला दम दाखवू शकले आहेत.
सध्या विजय चौधरी हे आपले गुरू हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदकेसरी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहेत.
संबंधित बातम्या