टी-20 विश्वचषकात रविवारी भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यात आर अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत सामना टीम इंडियाच्या पारड्यात टाकला. सामना संपल्यानंतर दोन दिवसांनी टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आर अश्विनचे आभार मानले आहेत.
दिनेश कार्तिकने अश्विनचे आभार मानण्याचे कारण खूप खास आहे. वास्तविक, भारताला विजयासाठी शेवटच्या २ चेंडूत २ धावांची गरज होती. मात्र २०व्या षटकातील पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला. कार्तिक बाद होताच पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केले. मात्र, शेवटच्या चेंडूवर फलंदाजीला आलेल्या अश्विनने सामना टीम इंडियाला जिंकून दिला.
जर टीम इंडिया हा सामना हरला असता तर दिनेश कार्तिक टीकेचा बळी ठरू शकला असता. विशेष म्हणजे हा सामना भारत आणि पाकिस्तान असल्याने कार्तिक अधिक ट्रोल झाला असता. म्हणूनच दिनेश कार्तिकने आर अश्विनचे आभार मानले आहेत. “मला वाचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद,” असे कार्तिकने म्हटले आहे. यावर अश्विननेही तामिळमध्ये मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला- अरे हे माझे कर्तव्य होते. दोन्ही क्रिकेटपटू तामिळनाडूचे असून दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.
२०२१ वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमी झाला होता ट्रोल
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर पराभूत झालेल्या संघातील खेळाडूंना ट्रोल केले जाणे सामान्य गोष्ट आहे. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला, तेव्हादेखील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ट्रोलचा शिकार झाला होता. मात्र टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने त्याचा बचाव केला.
T20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर दिनेश कार्तिक हा भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. टीम इंडियाने दिनेश कार्तिकला फिनिशरची भूमिका दिली आहे. या विश्वचषकानंतर दिनेश कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो.