मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup: आफ्रिका, वर्ल्डकप आणि पाऊस... मोठ्या स्पर्धांमध्ये जिंकलेले सामने पावसाने हिसकावले

T20 World Cup: आफ्रिका, वर्ल्डकप आणि पाऊस... मोठ्या स्पर्धांमध्ये जिंकलेले सामने पावसाने हिसकावले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 25, 2022 11:40 AM IST

T20 World Cup South Africa Vs Zimbabwe: कोणत्याही फॉरमॅटमध्ये कधीही विश्वचषक जिंकू न शकलेल्या दक्षिण आफ्रिकेचे पावसाशी विशेष नाते आहे. विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा पावसाने दक्षिण आफ्रिकेचा खेळ खराब केला आहे.

South Africa Vs Zimbabwe
South Africa Vs Zimbabwe

दक्षिण आफ्रिकेचा संघ बलाढ्य आहे असे म्हटले जाते, पण मोठ्या इव्हेंट्समध्ये आफ्रिकन संघ नेहमीच अपयशी ठरत आलेला आहे. ICC च्या मोठ्या स्पर्धांमध्ये निसर्गदेखील आफ्रिकेचा सर्वात मोठा शत्रू ठरतो. कारण ICC च्या मोठ्या इव्हेंट्समध्ये असे अनेकवेळा घडले आहे, जेव्हा आफ्रिकन संघ जिंकण्याचा मार्गावर होता, नेमके तेव्हाच पावसाने त्यांच्या विजयावर पाणी फेरले आहे. 

आफ्रिकेने जिंकणारी लढाई पावसामुळे हरली

यंदाच्या टी-२० विश्वचषकातदेखील असेच घडले आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात होबार्ट येथे सुपर १२ फेरीचा सामना खेळला गेला. हा सामना पावसामुळे प्रत्येकी ९ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने ९ षटकात ७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकन फलंदाजांनी धमाकेदार सुरुवात केली. त्यांचा सलामीवीर क्विंटन डीकॉकने डावाच्या पहिल्याच षटकात २३ धावा ठोकल्या. आफ्रिकेच्या संघाने अवघ्या ३ षटकात ५९ धावा चोपल्या. मात्र, आफ्रिकेचे नशीब खराब. पावसाला पुन्हा सुरुवात झाली आणि सामना रद्द करावा लागला. दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण विभागून देण्यात आला.

१९९२ च्या वर्ल्डकपमध्ये काय घडलं होतं 

तुम्हाला आठवत असेल अथवा नसेल, पण सर्वप्रथम १९९२ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा खेळ पावसाने बिघडवला होता. आफ्रिकेने १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकात उपांत्य फेरीत धडक मारली होती, ज्यात संघाला विजय मिळवण्याची संधी होती. आफ्रिकेचा संघ फायनल गाठण्याच्या अगदी जवळ होता. पण पावसाने सामन्याचा निकाल बदलला. तो सामना दक्षिण आफ्रिकेने पावसामुळे हरला.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर १९९२ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला एका चेंडूवर २२ धावांचे लक्ष्य मिळाले त्या कटू आठवणी आजही चाहत्यांच्या मनात दाटून येतात. २२ मार्च १९९२ रोजी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला. प्रथम खेळताना इंग्लंडने ४५ षटकांत ६ बाद २५२ धावा केल्या.

पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात आफ्रिकेला ४५ षटकात २५३ धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ४२.५ षटकांत ६ बाद २३१ धावा केल्या, तेव्हा पावसाने पु्न्हा व्यत्यय आणला. जेव्हा सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा आफ्रिकेच्या डावातील २ षटके कमी झाली होती पण लक्ष्य बदलले नाही.

पावसाने वारंवार अडथळा आणला आणि आफ्रिकेचे लक्ष्य वेळोवेळी बदलले गेले. आधी आफ्रिकेला १३ चेंडूत २२ धावांचे लक्ष्य मिळाले होते, त्यानंतर ७ चेंडूतही तेच लक्ष्य मिळाले. 

त्यानंतर पुन्हा १२ मिनिटे झालेल्या पावसामुळे इंग्लिश संघाच्या डावातून २ षटके कापली गेली आणि त्यानंतर आफ्रिकन संघासाठी ठेवलेले नवीन लक्ष्य मैदानाच्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर दाखवले गेले आणि सर्वांना आश्चर्यचकित धक्का बसला. जेव्हा क्रिकेट चाहत्यांच्या नजरा स्कोअर बोर्डवर गेल्या तेव्हा दक्षिण आफ्रिकेला १ चेंडूत २१ धावा करायच्या होत्या. ही घटना आजही दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात सुईसारखी टोचत असेल.

त्यावेळी डकवर्थ लुईस नियम नव्हता

त्या स्पर्धेत पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यांसाठी डकवर्थ लुईस आणि स्टर्न नियम नव्हते. हा नियम नंतर आला. त्या स्पर्धेसाठी असा नियम करण्यात आला होता की जर पावसामुळे षटके कापली गेली तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या त्या षटकांची गिनती होणार नाही ज्या षटकांमध्ये कमीत कमी धावा धावा झाल्या आहेत. कमी धावा झालेली षटके कापून त्याआधारे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला नवे लक्ष्य दिले जाईल.

‘मोस्ट प्रोडक्टिव ओव्हर’ या नियमामुळे आफ्रिकेसमोर विजयासाठी १ चेंडूत २१ धावांचे लक्ष्य होते.

२००३ वर्ल्डकपमध्येही पाऊस व्हिलन ठरला

२००३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत असेच घडले होते, जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेविरुद्धचा सामना सहज जिंकणार होता. तेव्हा इथेही पावसाने अडथळा आणला आणि सामना रद्द झाला. यावेळी D/L पद्धत आली होती, परंतु पाऊस थांबला नाही आणि या नियमामुळे सामना टाय च्या रुपात संपवावा लागला.

 

WhatsApp channel