मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Free hit Rules: फ्री हिटच्या नियमात बदलाची गरज; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने सांगितलं कारण

Free hit Rules: फ्री हिटच्या नियमात बदलाची गरज; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने सांगितलं कारण

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 25, 2022 11:00 AM IST

T20 World Cup: आय़सीसीच्या नियम २०.१ नुसार चेंडू तेव्हा डेड होते जेव्हा तो शेवटी यष्टीरक्षक किंवा गोलंदाजाच्या हातात जातो. याशिवाय सीमेपार गेल्यास किंवा फलंदाज आऊट झाल्यास चेंडू डेड ठरवला जातो.

फ्री हिटच्या नियमात बदलाची गरज; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने सांगितलं कारण
फ्री हिटच्या नियमात बदलाची गरज; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने सांगितलं कारण (AFP)

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटलं की, मेलबर्नमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी २० वर्ल्ड कप सामना वादग्रस्त पद्धतीने संपला. यानंतर आता खेळाच्या काही नियमांमध्ये दुरुस्ती करायला हवी. भारताने या सामन्यात २० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. भारताने ४ गडी राखून सामना जिंकला असला तरी मोहम्मद नवाजच्या या षटकात एक फ्री हिट मिळाला. त्यावर विराट कोहली क्लीन बोल्ड झाला. मात्र त्यानंतर बायच्या रुपाने ३ धावा त्यांनी घेतल्या. यावरूनच मार्क टेलरने नियमांमध्ये बदल करण्याची गरज व्यक्त केली.

भारताला विजयासाठी अखेरच्या तीन चेंडूत ५ धावांची गरज होती. विराट कोहली फ्री हिटवर बोल्ड झाला होता. मात्र चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेला. तेव्हा विराट आणि दिनेश कार्तिकने तीन धावा पळून काढल्या. नियमानुसार भारतीय संघाला तीन धावा मिळाल्या. मात्र पाकिस्तान संघाचा कर्णधार आणि इतर खेळाडुंनी याला विरोध केला. पण मैदानावरील पंच त्यांच्या निर्णयावर कायम राहिले कारण आयसीसीच्या नियमाविरोधात यात काहीच नव्हतं.

आय़सीसीच्या नियम २०.१ नुसार चेंडू तेव्हा डेड होते जेव्हा तो शेवटी यष्टीरक्षक किंवा गोलंदाजाच्या हातात जातो. याशिवाय सीमेपार गेल्यास किंवा फलंदाज आऊट झाल्यास चेंडू डेड ठरवला जातो. फ्री हिटमध्ये फलंदाजाला बोल्ड किंवा झेलबाद करता येत नाही. त्यामुळे चेंडू स्टम्पला लागल्यानंतर डेड होत नाही आणि धावा घेतल्या जाऊ शकतात. या नियमानुसारच भारतीय संघाने धावा काढल्या.

मार्क टेलरने वाइल्ड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं की, संघाने अशा परिस्थितीचा फायदा घ्यायला नको होता जो सर्वसामान्यपणे डिसमिसलमुळे होते. मला वाटतं जर चेंडू स्टम्पला लागतो तेव्हा तुम्ही एक चुकीचा फायदा मिळवत आहात. जसं आपण रविवारी पाहिलं की चेंडू कुठेही जाऊ शकतो आणि दुसरं हे की जर क्षेत्ररक्षण करणारा संघ धावबाद करण्याचा प्रयत्न करत आहे आणि बेल्स आधीच जमिनीवर पडल्यात. त्यामुळे स्टम्प हटवायला हव्यात आणि तेही कठीण आहे.

मला वाटतं की फलंदाज बोल्ड झाला किंवा फ्री हिटवर झेलबाद झाला तर तुम्ही नाबाद ठरता. पण चेंडू तेव्हाच डेड मानला गेला पाहिजे हेच योग्य आणि तर्काला धरून असेल. तुम्हाला एका फ्री हिटवर आऊट न होण्याची सूट मिळाली आहे पण तुम्ही दुसऱ्यांदा त्याचा फायदा घ्यायला नको असंही मार्क टेलरने म्हटलं.

WhatsApp channel

संबंधित बातम्या