मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC Final 2023 : विश्वचषकापूर्वीच टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, क्रिकेटमधील हा वादग्रस्त नियम आयसीसीकडून रद्द

WTC Final 2023 : विश्वचषकापूर्वीच टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, क्रिकेटमधील हा वादग्रस्त नियम आयसीसीकडून रद्द

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 04, 2023 06:51 PM IST

Soft Signal Rule : क्रिकेटमधील सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयावरून अनेकदा वाद झाल्यानंतर आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

ICC Abolish Soft Signal Cricket Rule
ICC Abolish Soft Signal Cricket Rule (PTI)

ICC Abolish Soft Signal Cricket Rule : जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी कसोटी विश्वचषकापूर्वीच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेल्या सॉफ्ट सिग्नलच्या नियमाला आयसीसीने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम भारत आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी विश्वचषकाच्या फायनलपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एका स्पोर्ट्स वेबसाईटने याबाबतचा खुलासा केला आहे. त्यामुळं आता या निर्णयाचा टीम इंडियासह ऑस्ट्रेलियन संघाला मोठा फायदा होणार आहे.

सॉफ्ट सिग्नलचा नियम काय आहे?

क्रिकेट सामन्यात झेलबाद किंवा अन्य निर्णयासाठी मैदानावरील पंच थर्ड अंपायर्सची मदत घेतात. त्यावेळी सर्व प्रकारचे अँगल बघूनही निर्णय घेता आला नाही तर थर्ड अंपायर्स मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवतात. अशावेळी बाद नसतानाही अनेक फलंदाजांना बाद घोषित करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर अनेकांनी सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयावर टीका करत हा नियम रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता आयसीसीकडून या वादग्रस्त निर्णयाला रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

स्लीपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडू घेतलेला झेल आणि धावबाद झाल्याच्या प्रकरणात अनेकदा सॉफ्ट सिग्नलचा निर्णय सामना फिरवणारा ठरत होता. तंत्रज्ञानाचा वापर करूनही अंतिम निर्णय मैदानावरील अंपायर्सना घ्यावा लागत असल्यामुळं अनेक संघांना त्याचा फटका बसला होता. भारत-ऑस्ट्रेलिया, इंग्लंड-पाकिस्तान यांच्या सीरिजमध्ये अनेक फलंदाजांना या नियमानुसार बाद ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सनेही सॉफ्ट सिग्नलचा नियम चुकीचा असल्याचं म्हटलं होतं.

WhatsApp channel