मराठी बातम्या  /  क्रीडा  /  VIDEO: विराटचा तर होताच, कार्तिकचाही नो बॉल होता! पाकिस्तानी खेळाडूंनीच केला खुलासा

VIDEO: विराटचा तर होताच, कार्तिकचाही नो बॉल होता! पाकिस्तानी खेळाडूंनीच केला खुलासा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 25, 2022 05:10 PM IST

india vs pakistan last over drama: T20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना प्रचंड रंगला होता. त्या सामन्यातील शेवटचे षटक खूपच वादग्रस्त ठरले. यावर पाकिस्तानी खेळाडूंनी आता पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. एका न्युज चॅनलवर माजी पाकिस्तानी दिग्गज खेळाडू अकीब जावेदने शेवटच्या षटकात जे झाले ते नियमानुसारच झाल्याचे सांगितले आहे.

india vs pakistan
india vs pakistan

भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषकात धमाकेदार सुरुवात केली. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. हा सामना खूपच रोमांचक होता, ज्यामध्ये विराट कोहलीने नाबाद राहून सामना जिंकवला. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

पण या सामन्यातील शेवटचे षटक खूपच वादग्रस्त ठरले. या षटकाची चर्चा अजूनही सुरू आहे. या षटकातील नो बॉल आणि फ्री हिटवरून बराच गदारोळ सुरु आहे. मात्र, आता खुद्द पाकिस्तानी माजी खेळाडूंनीच यावर पडदा टाकला आहे. जीओ न्युज या चॅनलवरील एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी शेवटच्या षटकात सर्व नियमानुसार झाल्याचे सांगितले आहे.

जियो न्युजच्या कार्यक्रमात माजी दिग्गज खेळाडू मोईन खान, अकीब जावेद आणि सध्याचा खेळाडू इमाद वसीम यांनी चर्चा करताना याचा स्वीकार केला आहे. यावेळी आकीब जावेदने म्हटले आहे की, “ शेवटच्या षटकात जे झाले ते नियमानुसार झाले. त्यात कुठेही अन्याय झाला नाही. विराट कोहलीचा तर नो बॉल होताच, शिवाय भारताने रिव्ह्यू घेतला असता तर दिनेश कार्तिकने खेळलेला नवाजचा दुसरा चेंडूदेखील नो असता.” पण कार्तिकने तो चेंडू क्रीजच्या बाहेर येऊन खेळल्याने भारताने त्या चेंडूवर नो बॉलचे अपील केले नाही.

तसेच, अकीब जावेदने ब्रॅड हॉगचा देखील समाचार घेतला. हॉगने फ्रि हिटवर बोल्ड झालेल्या कोहलीला ३ धावा का दिल्या, असा प्रश्न उपस्थित केला होता.

शेवटच्या षटकातला नेमका वाद काय?

जेव्हा टीम इंडियाला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. तेव्हा फिरकीपटू मोहम्मद नवाज गोलंदाजीस आला. त्याने विराट कोहलीला कंबरेच्या वर फूलटॉस बॉल दिला. त्यावर विराट कोहलीने षटकार ठोकला. मात्र, हा बॉल नो असल्याचे विराटने पंचांच्या लक्षात आणून दिले. पंचांनीही अंदाज घेत हा नो-बॉल असल्याचे जाहीर केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं त्यावर नाराजी व्यक्त केली. मात्र, फार ताणून न धरता सामना पुढे सुरू करण्यात आला.

या नो-बॉलमुळं भारताला फ्री हिटची संधी मिळाली. नवाजचा पुढचा चेंडू फ्री हिट होता. समोर विराट असल्याने नवाज प्रचंड दडपणाखाली होता आणि याच दबावाखाली त्याने वाइड बॉल टाकला. त्याला पुन्हा फ्री हिट बॉल टाकावा लागला. या चेंडूवर विराट बोल्ड झाला आणि यष्ट्या उडवून चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेला. या दरम्यान विराटने पळून तीन धावा पूर्ण केल्या. मात्र, विराट या चेंडूवर त्रिफळाचित झाल्याने भारताला या धावा कशा दिल्या. यावरुन देखील वाद सुरु आहे. कारण या तीन धावा भारताच्या धावांमध्ये धरल्या गेल्या. त्यामुळे सामना पुर्णपणे भारताच्या बाजूने झुकला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या