मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL Final CSK vs GT : चेन्नई सुपर किंग्स ५व्यांदा आयपीएल चॅम्पियन, शेवटच्या चेंडूवर जडेजाचा चौकार

IPL Final CSK vs GT : चेन्नई सुपर किंग्स ५व्यांदा आयपीएल चॅम्पियन, शेवटच्या चेंडूवर जडेजाचा चौकार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 29, 2023 05:36 PM IST

CSK Vs GT Final Live Score : आयपीएल 2023 चा अंतिम सामना आज (२९ मे) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळला गेलाा. या सामन्यात चेन्नईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

CSK vs GT Live Score
CSK vs GT Live Score

Cricket IPL Score, CSK vs GT 2023 Final IPL Match Updates : आयपीएल 2023 चा अंतिम सामना आज (२९ मे) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होत आहे. दरम्यान, आयपीएल फायनल २८ मे रोजी होणार होती. पण पावसामुळे संपूर्ण दिवस वाया गेला. त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना राखीव दिवशी म्हणजेच, आज (२९ मे) रोजी खेळवला जात आहे.

IPL Final CSK vs GT Score update

चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला. सीएसकेच्या विजयाचा हिरो ठरला तो रवींद्र जडेजा, त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. एमएस धोनीच्या टीम चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत धोनीने आता रोहित शर्माची बरोबरी केली आहे.

चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. गुजरातकडून हे षटक टाकण्याची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. तर क्रीजवर शिवम दुबे होता. मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतर ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर फक्त १ धाव आली. आता चेन्नईला ४ चेंडूत १२ धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर १-१ धावा आली.

आता सीएसकेला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूंवर १० धावांची गरज होती. तेव्हा रवींद्र जडेजा क्रीजवर होता. त्याने मोहित शर्माच्या चेंडूवर प्रथम षटकार आणि नंतर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.

या सामन्यात गुजरातने २१५ धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार हे लक्ष्य १५ षटकांत १७१ धावा करण्यात आले. प्रत्युत्तरात चेन्नई संघाने ५ विकेट्सवर १७१ धावा करत सामना जिंकला. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने २५ चेंडूत सर्वाधिक ४७ धावा केल्या. शिवम दुबेने ३२ आणि अजिंक्य रहाणेने झटपट २७ धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने ३ आणि नूर अहमदने २ बळी घेतले.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. साई सुदर्शनने संघासाठी ४७ चेंडूत ९६ धावांची तुफानी खेळी केली. त्याने ६ षटकार आणि ८ चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट २०४.२५ होता. सुदर्शनशिवाय ऋद्धिमान साहाने ५४ आणि शुभमन गिलने ३९ धावा केल्या. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने २ बळी घेतले.

CSK Vs GT Final Live Score : धोनी-रायडू बाद

१३व्या षटकात चेन्नईला दोन धक्के बसले. अंबाती रायडूने मोहित शर्माच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार आणि एक चौकार लगावला. यानंतर चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. रायुडूने आठ चेंडूंत १९ धावांची खेळी खेळली. यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहितने धोनीला मिलरकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. सध्या रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे क्रीजवर आहेत. CSK ला १२ चेंडूत २१ धावा हव्या आहेत.

CSK Vs GT Final Live Score : रहाणे बाद

११व्या षटकात चेन्नईला तिसरा धक्का बसला. मोहित शर्माने अजिंक्य रहाणेला विजय शंकरकरवी झेलबाद केले. त्याला १३ चेंडूत २७ धावा करता आल्या. सध्या शिवम दुबे आणि अंबाती रायुडू क्रीजवर आहेत. आता CSK ला २४ चेंडूत ५३ धावा हव्या आहेत.

CSK Vs GT Final Live Score : रहाणे-दुबे क्रीजवर

१० षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जने दोन गडी गमावून ११२ धावा केल्या आहेत. CSK ला ३० चेंडूत ५९ धावा हव्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे ११ चेंडूत २६ धावा आणि शिवम दुबे आठ चेंडूत आठ धावा केल्यानंतर फलंदाजी करत आहे.

CSK Vs GT Final Live Score : एकाच षटकात दोन धक्के

चेन्नई सुपर किंग्जला सातव्या षटकात दोन धक्के बसले. या षटकात नूर अहमदने ऋतुराज गायकवाड आणि नंतर डेव्हॉन कॉनवेला बाद केले. ऋतुराज १६ चेंडूत २६ धावा करून बाद झाला तर कॉनवेने २५  चेंडूत ४७ धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. सात षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ७८ धावा आहे. त्यांना आता ४८ चेंडूत ९३ धावांची गरज आहे. सध्या शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे क्रीजवर आहेत.

CSK Vs GT Final Live Score : कॉनवेची फटकेबाजी

सहा षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जने एकही विकेट न गमावता ७२ धावा केल्या आहेत. डेव्हॉन कॉनवे सध्या २२ चेंडूत ४४ आणि ऋतुराज गायकवाड १४ चेंडूत २५ धावांवर खेळत आहे. चेन्नईला आता ५४ चेंडूत ९९ धावांची गरज आहे.

CSK Vs GT Final Live Score : पॉवरप्लेमध्ये ५२ धावा

पॉवरप्लेच्या चार षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जने विकेट न गमावता ५२ धावा केल्या आहेत. आता CSK ला ६६ चेंडूत ११९ धावा हव्या आहेत. ऋतुराज गायकवाड १२ चेंडूत २३ धावा तर डेव्हन कॉनवे १२ चेंडूत २७ धावांवर खेळत आहे.

CSK Vs GT Final Live Score : ३ षटकात ३५ धावा

तीन षटकांनंतर चेन्नईने एकही विकेट न गमावता ३५ धावा केल्या आहेत. आता CSK ला ७२ चेंडूत १३६ धावा हव्या आहेत. सध्या डेव्हॉन कॉनवे नऊ चेंडूत २२ धावा तर ऋतुराज गायकवाड नऊ चेंडूत १२ धावांवर फलंदाजी करत आहे.

CSK Vs GT Final Live Score : पावसानंतर खेळ सुरू

पावसानंतर खेळ सुरू झाला आहे. चेन्नईसमोर १५ षटकात १७१ धावांचे लक्ष्य आहे. शमीने पहिले षटक पूर्ण केले. एका षटकानंतर चेन्नईने एकही विकेट न गमावता १० धावा केल्या आहेत. CSK ला आता ८४ चेंडूत १६१ धावा करायच्या आहेत.

CSK Vs GT Final Live Score : १२.१० वाजता सामना  सुरू होणार

१२.१० वाजता सामना पुन्हा सुरू होणार आहे. सीएसकेच्या डावातील पाच षटके कापण्यात आली आहेत. चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार आता १५ षटकात १७१ धावांचे लक्ष्य आहे.

चेन्नईने आतापर्यंत ३ चेंडूत ४ धावा केल्या आहेत. त्यानुसार चेन्नईला ८७ चेंडूत १६७ धावांची गरज आहे. चेन्नईसाठी खास बाब म्हणजे त्यांच्या १० विकेट शिल्लक आहेत. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे क्रीजवर आहेत. गुजरातच्या प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येकी ३ षटके टाकावी लागतील.

CSK Vs GT Final Live Score : ११:३० वाजता पुन्हा मैदानाची पाहणी

११:३० वाजता पंच पुन्हा मैदानाची तपासणी करतील. त्यांनी १०.४५ वाजता पाहणी केली मात्र मैदान ओले असल्याने कोणताही निर्णय झाला नाही. आता सामना कधी सुरू होणार हे ११:३० वाजता कळेल.

CSK Vs GT Final Live Score : षटकांमध्ये कपात होणार नाही

सामन्यासाठी मैदान तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे मैदानाला मोठा फटका बसला आहे. अंतिम सामन्यासाठी दोन तास अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. जर सामना पुन्हा ११.३० पर्यंत सुरू झाला तर षटकांमध्ये कोणतीही कपात होणार नाही.

CSK Vs GT Final Live Score : पाऊस थांबला

चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाऊस थांबला आहे. सामना लवकरच सुरू होऊ शकतो. षटके कापली जाण्याची शक्यता नाही. कव्हर काढले आहेत. सुपर-सोपर्स त्यांचे काम करत आहेत. मात्र, काही ठिकाणी जमिनीवर पाणी साचले. ते सुकवण्याचे काम केले जात आहे. अशा परिस्थितीत पूर्ण २० षटकांचा सामना होऊ शकतो. गुजरातने चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रात्री १०.४५ वाजता पंच पाहणी करतील.

CSK Vs GT Final Live Score : पावासाचा अडथळा

डकवर्थ-लुईस नियमानुसार, पाचव्या षटकाच्या शेवटी CSK साठी पुढील धावसंख्या असणे गरजेचे आहे.

४३/०

४८/१

५५/२

६५/३

७७/४

९५/५

म्हणजेच ५ षटकानंतर सीएसकेची धावसंख्या एकही विकेट न गमावता ४३ धावा, १ विकेट पडली तर ४८ धावा, दोन विकेट पडल्या तर ५५ धावा, तीन विकेट पडल्या तर ६५ धावा, चार विकेट पडल्या तर ७७ धावा आणि ५ विकेट पडल्या तर सीएसकेची धावसंख्या ९५ असणे गरजेचे आहे. 

दरम्यान सध्या जोरदार वारा वाहत असल्याने कव्हर झाकण्यासाठी ग्राउंड-कर्मचारी धडपडत आहेत. कट ऑफ वेळेला दोन तास बाकी आहेत, त्यानंतर षटके कापायला सुरुवात होईल.

CSK Vs GT Final Live Score : पावसामुळे सामना थांबला

चेन्नईचा डाव सुरू होताच पुन्हा एकदा मुसळधार पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. चेन्नईच्या डावातील एक षटकही पूर्ण होऊ शकले नाही. मोहम्मद शमीने तीन चेंडू टाकले आणि चेन्नईने विकेट न गमावता ४ धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे क्रीजवर आहेत. अहमदाबादमध्ये आज पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दिवसभर पाऊस पडला नाही, मात्र आता पाऊस सीएसकेसाठी खलनायक ठरू शकतो. नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठ्या प्रमाणावर चाहते आले आहेत. अशा स्थितीत हा पाऊस लवकरात लवकर थांबेल, अशी त्यांची अपेक्षा असेल.

CSK Vs GT Final Live Score : गुजरातच्या २१४ धावा

गुजरात टायटन्सने शानदार फलंदाजी करताना २०  षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. आयपीएल फायनलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या होत्या.

चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्यासाठी विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करावा लागणार आहे. यापूर्वी आयपीएल फायनलमध्ये २०० धावांचा पाठलाग फक्त एकदाच झाला होता. २०१४ साली फायनलमध्ये कोलकाताने पंजाबचे २०० धावांचे लक्ष्य यशस्वीपणाने गाठले होते. 

गुजरातकडून साई सुदर्शनने शानदार खेळी केली. त्याचे शतक ४ धावांनी हुकले. तो ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९६ धावा काढून बाद झाला. सीएसकेकडून पाथिरानाने ४४ धावा देत २ गडी बाद केले.

CSK Vs GT Final Live Score : सुदर्शनची झंझावाती खेळी

१७ षटकांनंतर गुजरातने २ बाद १७३ धावा केल्या आहेत. सध्या हार्दिक पांड्या दोन धावा करून फलंदाजी करत असून साई सुदर्शनने ४० चेंडूत ७६ धावा केल्या आहे. सुदर्शनने आतापर्यंत सात चौकार आणि चार षटकार मारले आहेत.

CSK Vs GT Final Live Score : साई सुदर्शनचं अर्धशतक

साई सुदर्शनने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने चौकारांसह अर्धशतक ठोकले. या मोसमातील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले. २१ वर्षीय सुदर्शन शानदार फलंदाजी करत आहे. १६ षटकांनंतर गुजरातची धावसंख्या २ बाद १५३ अशी आहे. सध्या हार्दिक पांड्या दोन चेंडूत एका धावेवर फलंदाजी करत असून साई सुदर्शनने ३५ चेंडूत ५७ धावा केल्या आहेत.

CSK Vs GT Final Live Score : साहा बाद

गुजरातला १४व्या षटकात आणखी एक धक्का बसला. दीपक चहरने रिद्धिमान साहाला धोनीकरवी झेलबाद केले. साहाने ३९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. १४ षटकांनंतर गुजरातची धावसंख्या २ बाद १३१ आहे. सध्या साई सुदर्शन आणि हार्दिक पंड्या क्रीजवर आहेत.

CSK Vs GT Final Live Score : साहा-सुदर्शननं डाव सावरला

१२ षटकांनंतर गुजरात टायटन्सने १ गडी गमावून १०९ धावा केल्या आहेत. साई सुदर्शन १७ चेंडूत २०  धावा आणि ऋद्धिमान साहाने ३५ चेंडूत ४८ धावा करून फलंदाजी करत आहे.

CSK Vs GT Final Live Score : शुभमन गिल बाद

गुजरातला पहिला धक्का सातव्या षटकात बसला. शुभमन गिल धोनीच्या शानदार स्टंपिंगचा बळी ठरला. शुबमनने २० चेंडूत ३९ धावा केल्या. शुभमनने आपल्या खेळीत ७ चौकार मारले. ४ धावांवर असताना दीपक चहरने त्याचा झेल सोडला होता. 

CSK Vs GT Final Live Score : पॉवरप्लेमध्ये ६२ धावा

पॉवरप्लेमध्ये गुजरातने एकही विकेट न गमावता ६१ धावा केल्या. शुभमन गिल १७ चेंडूत ३६ धावा आणि ऋद्धिमान साहाने १९ चेंडूत २६ धावा करून खेळत आहे.

CSK Vs GT Final Live Score : गुजरातची शानदार सुरुवात

झेल सोडल्यानंतर तिसऱ्या षटकात दीपक चहर गोलंदाजी करायला आला. या षटकात वृध्दिमान साहाने १६ धावा केल्या. त्याने षटकात एक षटकार आणि एक चौकार लगावला.तीन षटकांनंतर गुजरातची धावसंख्या बिनबाद २४ आहे. साहा १३ चेंडूत २० धावा आणि शुभमन पाच चेंडूत ४ धावांवर फलंदाजी करत आहे.

CSK Vs GT Final Live Score : चहरने शुभमनचा झेल सोडला

दुसऱ्या षटकात तुषार देशपांडे गोलंदाजी करायला आला. शुभमनने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअरवर शॉट खेळला पण चेंडू तिथे उभा असलेल्या दीपक चहरकडे गेला. पण चहरला हा सोपा झेल घेता आला नाही. चेंडू हाताला लागला आणि खाली पडला. त्यावेळी शुभमन चार धावांवर फलंदाजी करत होता. दोन षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एकही विकेट न गमावता ८ धावा आहे.

CSK Vs GT Final Live Score : दोन्ही संघ

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थीक्षाना

CSK Vs GT Final Live Score : चेन्नईची प्रथम गोलंदाजी

गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच गुजरातच्या प्लेइंग-11 मध्येही कोणताच बदल नाही.

CSK vs GT Live : समारोप सोहळा सुरु

IPL 2023 चा समारोप सोहळा (IPL Closing Ceremony 2023 Performance) सुरु झाला आहे. रॅपर-गायक किंग परफॉर्म करत आहे. धोनी मैदानात येताच किंगने ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना रे, दिल से जुदा मत होना रे गाणं गायलं. धोनी मैदानात उतरताच चाहत्यांनी जल्लोष केला. यानंतर किंगने  तू मान मेरी जान, तुझे जाने ना दूंगा. हे गाणं गायलं. पण यादरम्यान कॅमेऱ्याचे लक्ष धोनीवरच राहिले.

CSK vs GT Live : अहमदाबादमध्ये सध्या ढगाळ वातावरण

अहमदाबादमध्ये (Ahmedabad Weather Report) सध्या संध्याकाळी ६ वाजता ढगाळ वातावरण आहे. AccuWeather च्या अहवालानुसार रात्री १० वाजेपर्यंत ढगाळ वातावरण राहील. मात्र, रिपोर्टनुसार पावसाची शक्यता नाही. रिपोर्टनुसार, अहमदाबादमध्ये सध्या खूप उष्णता आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे काल रात्री १०.४५ वाजल्यापासून पाऊस झालेला नाही.

CSK vs GT Live : अहमदाबादमध्ये सध्या हवामान स्वच्छ

क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अहमदाबादमध्ये आज आतापर्यंत तरी पाऊस पडला नाही. सध्या हवामान स्वच्छ आहे. मात्र रात्री ७ ते ११ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, कालच्या प्रमाणे मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.

CSK vs GT Live : हार्दिक २०१५ पासून एकही फायनल हरलेला नाही

गुजरातचा कर्णधार हार्दिक २०१५ च्या IPL नंतर एकही फायनल हरलेला नाही. यादरम्यान त्याने ५ फायनल खेळल्या आहेत आणि त्या सर्व जिंकल्या आहेत. २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून अंतिम सामना खेळला आणि त्याचा संघ चॅम्पियन बनला. त्याच वेळी, २०२२ मध्ये गुजरातचा कर्णधार असताना हार्दिकने विजय मिळवला होता.

CSK vs GT Live : सुपर ओव्हर होऊ शकते

पहिल्या दिवशी सुपर ओव्हरचा नियम नव्हता, पण राखीव दिवशी सुपर ओव्हरचा नियम लागू केला जाईल. जर पाच षटकांचा सामनाही झाला नाही तर दोन्ही संघ सुपर ओव्हर खेळतील आणि सुपर ओव्हरमध्ये चॅम्पियन ठरवला जाईल. आज, पाच षटकांच्या सामन्याव्यतिरिक्त, सुपर ओव्हरसाठी देखील कट ऑफ वेळ असेल. 

आजही पावसामुळे सामना झाला नाही, तर साखळी फेरीत गुणतालिकेत अव्वल असणारा संघ विजेता मानला जाईल. साखळी फेरीअखेर गुजरात २० गुणांसह अव्वल, तर चेन्नई १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होते. पावसामुळे सामना झाला नाही तर गुजरात टायटन्सचा संघ चॅम्पियन होईल.

CSK vs GT Live : येत्या काही तासांत पाऊस पडू शकतो

सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर अहमदाबादमध्ये आकाश ढगाळ आहे. स्थानिक अहवालानुसार पुढील काही तासांत पाऊस पडू शकतो. साखळी फेरी आणि प्लेऑफसह, अंतिम फेरीपूर्वीचा एकच सामना पावसामुळे रद्द झाला. तो सामना चेन्नई आणि लखनौ यांच्यात एकना स्टेडियमवर होणार होता.

 

CSK vs GT Live : संभाव्य प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना

इम्पॅक्ट प्लेयर - पाथीराणा

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवाटिया, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद

इम्पॅक्ट प्लेयर - यश दयाल

WhatsApp channel